'एलसीबी'ने आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:25 PM2018-09-22T22:25:32+5:302018-09-22T22:26:04+5:30
गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढली. चोरी, दारू, जुगार, सट्टापट्टी, कोंबड बाजार, गांजा आदी प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवाणगी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढली. चोरी, दारू, जुगार, सट्टापट्टी, कोंबड बाजार, गांजा आदी प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवाणगी केली.
अडीच महिन्यापुर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे ३ जुलै रोजी एलसीबीचा कारभार येताच सुरूवातीला काही दिवस त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणांचा अभ्यास केला. आता अवघ्या अडीच महिन्यात गुन्हेगारांच्या मसक्या आवळणे सुरू केले आहे. त्यांच्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांच्या अधिनस्त कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले आहेत. त्यांच्या वाढलेल्या कामाचा गतीचे परिणाम अल्पावधीतच दिसू लागले. शहरात आणि जिल्ह्यात घडलेल्या अनेक गुन्ह्यातील पसार आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गावरून जनावरांची मोठी वाहतूक होते त्याविरूद्ध धाडसत्र राबवून आतापर्यंत २२ लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जुगार, सट्टापट्टी, तासपत्ती जुगार, कोंबड बाजार आदींवर धाडी घालून २५ गुन्ह्यांची नोंद करून ५८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १९ लाख १७ हजार ७३८ रूपये जप्त केले. तसेच दारूबंदी कायद्यांन्वये २६ गुन्ह्यात २८ जणांना अटक केली. भंडारा शहरात २३ आणि २४ आॅगस्ट रोजी दोन इसमांचे मोबाईल हिसकावून घेण्याची घटना घडली होती. याप्रकरणात एलसीबीने दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याजवळून मोबाईल हस्तगत केले तर २७ जुलै रोजी शहरातील रजनीनगरातील एका अपंग व्यक्तीच्या घरातून एटीएमची चोरी झाली होती. चोरट्यांनी या कार्डाच्या मदतीने त्यांच्या खात्यातून २० हजार रूपये काढले होते. याप्रकरणाचा तपास एलसीबीकडे येताच ऋतिक उर्फ व्यंकटेश्वर विश्वचरण पेठकर आणि सुनील वामनराव क्षीरसागर या दोघांना अटक केली. तसेच मोटरसायकल चोरट्यांनाही जेरबंद करण्यात आले. चोरी गेलेल्या पाच मोटरसायकल एलसीबीच्या पथकाने जप्त केल्या. चोरी आणि घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आणून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व इतर साहित्य असा आठ लाख ३३ हजार ९६४ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. गत अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडेकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे प्रमुख रविंद्र मानकर व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.
सराईत चोरटा प्रवीण जेरबंद
भंडारा जिल्हा पोलिसांना वॉन्टेड असलेला सराई चोरटा प्रवीण अशोक डेकाटे रा. टिळक वॉर्ड मोहाडी याला एलसीबीच्या पथकाने देव्हाडी येथे २ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याने साकोली तालुक्यातील लवारी, भंडारा तालुक्यातील बेला, नागपूर ग्रामीण हद्दीतील तारसा, अशा पाच घरफोडींची कबूली दिली. त्याच्याजवळून चोरीतील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न आहे. एक तर गुन्हा घडूच नये आणि घडला तर लगेच तो उघडकीस यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.
-रवींद्र मानकर, पोलीस निरीक्षक, एलसीबी.