झेंडी-मुंडी अड्ड्यावर एलसीबीची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:47+5:302021-08-28T04:39:47+5:30
लाखांदूर : गावातील आठवडी बाजार चौकात बेकायदेशीरपणे झेंडी-मुंडी जुगार भरवून पैशाची हारजीतची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ...
लाखांदूर : गावातील आठवडी बाजार चौकात बेकायदेशीरपणे झेंडी-मुंडी जुगार भरवून पैशाची हारजीतची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती भंडारा एलसीबीला देण्यात आली. सदर माहितीवरून गस्तीवर असलेल्या एलसीबी पोलिसांनी झेंडी-मुंडी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. सदर घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मासळ येथे घडली. या घटनेत सुभाष आडकिने (३५) व नंदू काळे (३२, दोन्ही रा. मासळ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास स्थानिक मासळ येथील आठवडी बाजार चौकात बेकायदेशीरपणे घटनेतील आरोपी परिसरातील काही नागरिकांना घेऊन झेंडी-मुंडीचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती भंडारा एलसीबीला देण्यात आली. सदर माहितीवरून गस्तीवर असलेल्या एलसीबीने झेंडी-मुंडी अड्ड्यावर धाड टाकली असता रोख १५१० रुपये व झेंडी-मुंडीच्या साहित्यासह २ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील ऊईके, साहाय्यक फौजदार सुधीर मडामे, पंकज भिञे, राजू दोनोडे, प्रशांत करंजेकर आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी घटनेतील आरोपींच्या विरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.