पट्टेदार वाघाचा इसमावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:47 PM2018-05-16T22:47:46+5:302018-05-16T22:47:46+5:30
आष्टी - लोभी शिवारातील तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने लोभी येथील शेतकरी चंद्रपाल पुष्पतोडे (४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आष्टी - लोभी शिवारातील तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने लोभी येथील शेतकरी चंद्रपाल पुष्पतोडे (४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. वनअधिकारी तथा पोलिसांच्या बंदोबस्ताकरिता ताफा असताना त्यांच्या समक्ष वाघाने हल्ला केला, हे विशेष.
आष्टी लोभी येथील शिवारातील तलाव परिसरात मंगळवारी गौपाले यांच्या शेतात पट्टेदार वाघ शेतकऱ्यांना दिसला. याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाºयांना देण्यात आली. रेस्क्यू आॅपरेशन त्यानंतर सुरु झाले. दरम्यान तलावपरिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. नागरिकांनी मोठा आवाज करून पट्टेदार वाघाच्या दिशेने दगड भिरकावले. एकच गोंधळ व गोंगाटाने वाघ विचलीत झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाघाने लोभी येथील चंद्रपाल पुष्पतोडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डावा पाय व मांडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. वनअधिकारी, कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थ मदतीला धावल्याने वाघ तिथून पळाला. सुदैवाने चंद्रपाल थोडक्यात बचावला. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर भंडारा व तेथून नागपूर हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाघाचे मध्य प्रदेशाकडे पलायन
मध्यप्रदेश व महाराष्ट्राची सीमा लागून आहेत. हा परिसर वाघाचा कॉरिडोअर असल्यामुळे या परिसरात वाघाचे वास्तव्य असते, अशी माहिती नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश धनविजय यांनी दिली. वरिष्ठ अधिकाºयांनी आष्टी लोभी शिवारात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर खबरदारी व वनकर्मचाºयांना निर्देश देण्याकरिता उपवनसंरक्षक विवेक हौशिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक चोपकर, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर रेस्क्यू आॅपरेशन पथक व पोलीस कर्मचारी दिवसभर तैनात करण्यात आले होते.
तलाव व शेतशिवारात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी वाघाच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे वाघ अनियंत्रित झाला. वाघाने चंद्रपाल यांच्यावर हल्ला केला. उपस्थितांनी वाघाला हिसकावून लावले.
-नितेश धनविजय,
वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.