उमेदवार ठरविताना नेत्यांचीच परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:11+5:30
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, उमेदवार ठरविताना नेत्यांचा कस लागत असल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी घोषित केली नसली तरी संभाव्य उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व चर्चा करीत आहे; परंतु सध्या सर्वच पक्षांनी चाचपणी करून संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.
जिल्ह्यात युती आघाडी होणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना ५२ उमेदवार शोधणे जिकरीचे काम आहे, तसेच पंचायत समितीसाठी १०४ सक्षम उमेदवार शोधण्याचे दिव्य आहे. त्यातही आरक्षित आणि महिला उमेदवारांचा शोध घेताना पक्ष नेतृत्वाचा कस लागत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, तालुकानिहाय बैठकी घेतल्या आहेत. या बैठकीतून उमेदवारांचे मनोगत ऐकून घेतले आहे. राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असून, त्यांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, प्रत्येक मतदार संघात सक्षम उमेदवार देण्यावर त्यांचा भर आहे. शिवसेना या निवडणुकीत ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. तर भाजपने कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याचा चंग बांधला आहे. अशा स्थितीत सक्षम उमेदवार देताना सर्वच पक्षांचा कस लागत आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे संख्याबळ होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असला तरी निवडणुकीनंतर युती-आघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखायची आहे, तर शिवसेना व भाजप त्याच ताकदीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
गणेशपूरवर बाहेरील उमेदवारांचा डोळा
- भंडारा शहरालगतचा गणेशपूर हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सुशिक्षित मतदारसंघ म्हणून गणेशपूरची ओळख असून, येथे निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. स्थानिक उमेदवारांसोबतच बाहेरील उमेदवारही या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. अनेकांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार लढत गणेशपूर जिल्हा परिषद मतदारसंघात होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यासोबतच अनेक अपक्षही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाहेरील उमेदवाराला मतदार कितपत स्वीकारतात, हे मात्र काळच ठरवेल.
पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही
- बुधवार १ डिसेंबरपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या नामांकनाला प्रारंभ झाला. परंतु पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नाही. प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे. अद्याप उमेदवारही पक्षांनी घोषीत केले नाही.