झुकलेली झाडे देतात अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:01 PM2018-05-19T23:01:20+5:302018-05-19T23:01:20+5:30
कोंढा ते पवनी राज्यमार्गावर अपघाताला कारणीभूत बाभूळ व अनेक झाडाची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पवनी यांनी त्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा कोसरा : कोंढा ते पवनी राज्यमार्गावर अपघाताला कारणीभूत बाभूळ व अनेक झाडाची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पवनी यांनी त्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राज्यमार्ग अरुंद होत आहे. बाजूला जागा मिळत नाही. तसेच झाडाची वाढ झाल्याने दोन वाहने एकमेकाला क्रॉस केल्यास झाडाच्या फांद्या लागत असतात. काल रात्री कोंढा गावाजवळ वरठी येथून उन्हाळी धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक बाभूळच्या झाडाला धानाचे पोते लागल्याने काल रात्री अपघातग्रस्त झाला होता बचावला पण ट्रकमधील जवळपास २० धानाचे पोते खाली पडले. त्यामुळे धानाचा सडा रोडवर सांडला. अंदाजे १५ ते २० हजार रुपयाचे नुकसान झाले. राज्यमार्गावर कोंढा ते पवनी मार्गावर झाडाचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे. वादळात अनेक झाडे झुकली आहेत. त्यामुळे ती रस्त्यावर आली आहेत. तेव्हा बांधकाम विभागाने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. राज्यमार्गावर भंडारा ते निलज पर्यंत मेनरोडला लागून बैलबंडी जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. पण सध्या बैलबंडी, वाटसरुंसाठी रस्ता नसल्याने वाटसरू, मोटारसायकलस्वार, सायकलस्वार व बस, ट्रक, जीप सर्व वाहने डांबरीकरण झालेल्या रस्त्याने जातात. बाजूला सुलूप अत्यल्प आहे. त्यामुळे राज्यमार्ग क्र. २७१ वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बैलबंडी जाण्याकरिता खडीकरणाचे रस्ते आवश्यक आहे.
यासाठी राज्य मार्गावर रोडवर आलेले झुडूप व झाडे तोडण्यात यावे. तसेच त्याजागी नवीन झाडाची लागवड बांधकाम विभागाने करावी अशी मागणी निसर्गप्रेमी लोकांनी मागणी केली आहे.