धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
By admin | Published: April 6, 2017 12:22 AM2017-04-06T00:22:07+5:302017-04-06T00:22:07+5:30
शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आणला गेला. त्यापुढे जाऊन डिजीटल वर्ग, शाळा बनविण्याचा घाट बांधला गेला.
आवश्यक वर्गखोल्या ४० : धोकादायक ५२ वर्गखोल्या
मोहाडी : शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आणला गेला. त्यापुढे जाऊन डिजीटल वर्ग, शाळा बनविण्याचा घाट बांधला गेला. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती विद्यार्थ्यांच्या अपघातांची प्रतीक्षा करीत आहे. तथापि जिल्हा परिषदेचे जुन्या इमारतीचे निर्लेखन मंजूरी व इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थी टिकवून घेण्यासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या अन् पुरेशा सुविधा उत्प्रेरक ठरतात. तथापि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याच्या नादात पायाभूत सुविधांकडे जिल्हा परिषद कानाडोळा करीत आहे. मोहाडी तालुक्यात तब्बल ५२ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे सादर करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांना ४० वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. तथापि या आधी शाळा निर्लेखन करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद भंडाराकडे सादर झाले. किमान त्यांना तरी निर्लेखनाची मंजूरी देण्यास अडचण नव्हती.
जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ बाब असल्याने धोकादायक इमारती जि.प. च्या परवानगी शिवाय पाडता येत नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच धोकादायक इमारती पाडल्या जाणार का असा सवाल पालक करीत आहेत. कान्हळगाव / सिर. येथील ८० वर्षापूर्वीची शाळेची इमारत धोकादायक आहे. त्यासंबंधी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचेकडे निवेदन, ठराव सादर करण्यात आले. मात्र कर्णबधीर झालेल्या जिल्हा परिषदेने त्या कागदांकडे बघण्याचे सौजन्य दाखविले नाही. लोकमतने कान्हळगाव / सिर. शाळेची व्यथा मांडली. अन् काय आश्चर्य. गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून ते शिक्षणाधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांनी कान्हळगाव / सिर. या शाळेकडे धाव घेतली. विशेषत्वाने प्राधान्याने लवकरच निर्लेखनाची मंजूरी व नवीन शाळा तसेच दुरुस्ती करावयाच्या वर्गखोल्यांची संख्या ८८ आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निधीतून पटसंख्या व शिक्षक संख्यानुसार ४२० नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. तसेच ३२ वर्गखोल्या निर्लेखीत करायच्या आहेत. पंचायत समितीने २०१५-१६ मध्ये जि.प. प्राथमिक शाळा वरठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोना, जि.प. प्राथमिक शाळा आंधळगाव, जि.प. प्राथमिक शाळा रोहणा, जि.प. शाळा मोहगाव / करडी, जि.प. प्राथमिक शाळा सिरसोली, जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव या शाळांनी इमारत निर्लेखन करण्यासाठी पाठविले आहेत. अद्याप जिल्हा परिषदेने इमारत निर्लेखनाची मंजूरी दिली नाही.
मोहाडी तालुक्यात ५२ वर्गखोल्या धोकादायक आहेत. याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ पंचायत समितीला सादर करावे. याबाबत मुख्याध्यापकांना पत्र देण्यात आली आहेत. काल पर्यंत केवळ सहा - सात शाळांचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाल्याची माहिती आहे. इमारत दिली जाईल याची शाश्वती दिली याचा अर्थ शाळा व्यवस्थापन समितीने पाठविलेल्या ठरावांना जिल्हा परिषद गंभीरतेने घेत नाही असेच दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळांकडून आलेले निर्लेखनाचे प्रस्ताव जिल्हा परिषद भंडाराकडे सादर करण्यात आले आहेत. एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत.
-रमेश गाढवे,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, मोहाडी.