नाश्ता करायला रुग्णालयातून दुचाकीने निघाला, अन् थेट एसटीवरच धडकला
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 23, 2023 09:18 AM2023-08-23T09:18:03+5:302023-08-23T09:18:46+5:30
अगदी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवरच जाऊन धडकला.
गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेला युवक सकाळी नाश्ता करण्यासाठी चौकात दुचाकीने पोहोचला, परंतु अगदी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवरच जाऊन धडकला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. ही घटना बुधवारी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी टी पॉइंट परिसरात घडली. राहुल श्रीराम ढोरे (२४, चप्राड) असे जखमी दुचाकी चालक युवकाचे नाव आहे.
राहुल यांच्या नात्यातील महिला रुग्णालयात दाखल असल्याने तो मदतीसाठी रात्री दवाखान्यातच थांबला होता. सकाळी भूक लागल्याने दवाखान्यातीलच एका व्यक्तीची दुचाकी (एम एच ३१ /बीझेड ७०४४) मागून तो नाश्ता करायला निघाला होता. नाश्ता आटोपून दवाखान्याकडे विरुद्ध दिशेने परत येताना लाखांदूर भंडारा मार्गावरील चौकात भंडारा आगाराची बस (एमएच ४० /एन ८८७१) वळण घेत असताना धडक दिली. यात राहुल जखमी झाला.
ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ राहुलला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे.