डोंगरदेव शेतशिवारात पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा
By Admin | Published: January 6, 2016 12:35 AM2016-01-06T00:35:51+5:302016-01-06T00:35:51+5:30
कोका वन्यजीव अभयारण्याशेजारील डोंगरदेव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ सोमवारला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिसून आला.
करडी (पालोरा) : कोका वन्यजीव अभयारण्याशेजारील डोंगरदेव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ सोमवारला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. डोंगरदेव नाल्याच्या बाजूने आलेल्या वाघाचे पदचिन्ह मिरचीच्या शेतात दिसून आले. या पाऊलखुणामुळे शेतकऱ्यांत भीती पसरली आहे. दुसरीकडे पट्टेदार वाघ बेपत्ता अल्फा वाघीण तर नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
कोका अभयारण्यातील अल्फा नामक वाघीण आॅक्टोबर २०१५ पासून बेपत्ता आहे. तिची तिन्ही बछडे अभयारण्यात सुरक्षित आहेत. परंतु अजूनपर्यंत तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत वनाधिकाऱ्यांना विचारले तर शोधाशोध सुरु असल्याचे सांगण्यात येते. या वाघिणीच्या शोधासाठी जंगल परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ती एकाही कॅमेऱ्यात दिसून आली नाही. मध्यंतरी माटोरा परिसरात एका वाघाचे पदचिन्ह आढळून आले होते. त्यावेळी ती ‘अल्फा’च असल्याचे वनाधिकारी सांगत होते. परंतु अधिकृतरित्या अद्याप सांगितले नाही. ३ जानेवारीला रात्रीच्या १०.३० वाजताच्या सुमारास डोंगरदेव शेतशिवारात एका पट्टेदार वाघाला पाहण्यात आले. डोंगरदेव शिवारातील बंडू बारापात्रे या शेतकऱ्याच्या शेतात रात्री तो वाघ डोंगरदेव नाल्याच्या बाजूने आला. वाघ मिरचीच्या शेतात शिरताच शेतातील कुत्र्यांनी आरडाओरड केली. पहारेकऱ्याने उठून पाहिले असता तो वाघ मिरचीच्या शेतातून पुन्हा नाल्याच्या दिशेने निघून गेल्याचे सांगितले. मिरचीच्या शेतात वाघाच्या पाऊलखुणा जशाच्या तशाच आहेत. (वार्ताहर)