कोरोनाच्या संकटात आमदारांचा स्वखर्चातून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:00 AM2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:25+5:30
व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्यांची पूर्वीपासून ख्याती आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणे ही परंपरा त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून मिळाली आणि आजही ते जपत आहेत.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : संकटकाळी लोकांच्या मदतीला धावून जाणारे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे अनेक मंडळी राजकारणात आहेत. शासकीय फंडातून मदतीची रसद देऊन मोठेपणा दाखविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. परंतु संकटाच्या काळात मदतीला धावून जाताना स्वत:च्या खिशात हात घालणारे क्वचित दिसतात. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे हे यापैकी एक. कोरोनाच्या संकटात एक दोन नव्हे तब्बल ३० हजार कुटुंबांना तेही स्वखर्चातून मदतीचा हात दिला. आजही ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत गावागावात गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत.
व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्यांची पूर्वीपासून ख्याती आहे. लोकांच्या मदतीला धावून जाणे ही परंपरा त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून मिळाली आणि आजही ते जपत आहेत.
कारेमोरे यांना राजकीय वारसा नाही. वडील उत्तम व्यावसायिक होते. त्यांच्या व्यवसायाचा गाडा समोर नेत आहेत. कमी वयात यशस्वी उद्योजकांच्या यादीत प्रथम क्रमांकाने ते ओळखले जाऊ लागले. राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चाचपडले. विरोधकांच्या हल्ल्यात अडकले. पण हिंमत सोडली नाही. तांदूळ उद्योगात ते अनेकांचे आयकॉन झाले आहेत. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणाही मिळाली. कोरोना विषाणूच्या संकटात त्यांनी मदतीचा झंझावात सुरु केला. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना शासकीय मदतीपूर्वी वैयक्तिक मदत पोहचवली. संपूर्ण क्षेत्रात स्वखर्चाने सुरुवातीला भाजीपाला वाटला. अनेक कुटुंबांना अन्नधान्य व गरजेपुरते पैसेही वाटले. आवश्यक मास्क व सॅनिटायझरही दिले. जवळपास ३० हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले असून आजही ते अविरपणे मदतीचा हात देत आहेत.
राजकारणी लॉकडाऊन, कारेमोरे गावागावांत
कोरोनाच्या धास्तीने अनेक राजकारणी लॉकडाऊन झाले आहेत. परंतु आमदार राजू कारेमोरे आजही प्रत्येक गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. विधानसभा क्षेत्रातील सर्व दवाखाने, पोलीस ठाणे, भाजी विक्रेते यांना भेटी देत आहेत. प्रत्येक गावच्या आठवडी बाजारात ते समस्या ऐकून घेताना दिसून येतात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे दौरे अविरत सुरु असून कोरोनाच्या संकटात त्यांनी कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही. आजही ते मदतीसाठी तत्पर असतात. आमदार राजू कारेमोरे यांनी लॉकडाऊनच्या काळात अख्खा मतदार संघ पिंजून काढला.