लेंडेझरी-तीर्थक्षेत्र गायमुख डांबरीकरणाचा रस्ता ठरतोय धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 01:27 PM2024-07-04T13:27:40+5:302024-07-04T13:30:15+5:30
Bhandara : रस्त्यावर काय ते खड्डे... काय तो चिखल !
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लेंडेझरी ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गायमुख रस्ता हा डांबरीकरणाचा असून, या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असून, चिखल व पाण्यातून ग्रामस्थांना रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावर कोट्यवधींच्या निधी खर्च केला जातो, असे सांगण्यात येते, परंतु अल्पशा पावसातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुसळधार पावसात या रस्त्याला तलावाचे रूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना काय खड्डे... काय चिखल... काय पाणी.... असे तोंडून आपसूकच निघते.
लेंडेझरी हे गाव तुमसर मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगात येतो. घनदाट जंगल या परिसरात असून, आदिवासी बहुल असे हे क्षेत्र आहे. लेंडेझरी ते तीर्थक्षेत्र गायमुख, असा हा दहा ते बारा किलोमीटर अंतराचा रस्ता असून, हा रस्ता डांबरीकरणाचा आहे, परंतु या रस्त्यावरील डांबरीकरण संपूर्ण उखडले आहे.
रस्त्यातील गिट्टी बाहेर येऊन या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्ळ्याला आता सुरुवात झाली. अल्पशा प्रमाणात या परिसरात पाऊस पडला आहे, परंतु या रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असून, रस्ता चिखलमय व निसरडा झाला आहे.
या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील खड्यामधील असलेल्या पाण्याच्या अंदाज येत नाही, त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने कुठून चालवावे, असा प्रश्न येथे नागरिकांना पडला आहे.
रस्ते बांधकामाकरिता उदासीनता
पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील रस्ते हे खड्डेमय होऊन निसरडे होतात. शेतात काम करणारे शेतकरी आपले साहित्य घेऊन याच रस्त्याने शेतात जातात. ते याच रस्त्याने परत घरी जातात, अशा वेळेस या चिखलमय व खड्डे असलेल्या रस्त्याने चालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, अनेक वेळा अपघाताची शक्यता येथे अधिक असते. बांधकाम विभागाने किमान या रस्त्यावर दुरुस्ती करण्याची गरज होती. या रस्त्याचे बांधकाम सहा ते सात वर्षांपूर्वी झाले होते, अशी माहिती पुढे येत आहे. या रस्त्याने जड वाहतूक नाही, त्यामुळे या रस्त्यावर खड्डे कसे पडले, हा संशोधनाचा विषय आहे. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट का करण्यात आले, याची चौकशी करण्याची गरज आहे.