लाखांदूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! श्वानासह ३६ कोंबड्या केल्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 01:11 PM2022-02-10T13:11:48+5:302022-02-10T13:25:39+5:30
लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून बुधवारी खैरीपट येथे रात्रीच्या सुमारास दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार मारल्याची घटना घडली.
भंडारा : लाखांदूर तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच असून दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका श्वनाला ठार मारल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गावकऱ्यांनी फटाके फोडून बिबट व तिच्या दोन बछड्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला.
खैरीपट येथील शेतकरी शुभम भागडकर यांचा गावाजवळ स्मशानभूमीलगत जनावारांचा कोठा आहे. बुधवारी रात्री ते नेहमी प्रमाणे आपला मित्र राकेश दोनाडकर सोबत गोठ्यात दूध काढायला गेले होते. दुध काढत असताना तेथे अचानक मादी बिबट तिच्या दोन बछड्यासह आली. बिबट्याला पाहताच या दोघांनी शेजारील एका घरात आश्रय घेतला. मात्र, बिबटाने गोठ्यातील ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार केले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावकरी धावून आले. फटाके फोडून बिबटाला हुसकावून लावले. मात्र शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून पंधारा दिवसापूर्वी दहेगाव जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या लाखांदूर येथील प्रमोद चौधरी याला बिबट्याने ठार मारले होते. तर सरांडी येथे रानडुकरांचा कळप भरवस्तीत शिरून एका बालकाला गंभीर जखमी केले होते. तर शेत गत आठवड्यात शेतात रानगव्याचे दर्शन झाले होते. या प्रकारामुळे तालुक्याती भीतीचे वातावरण पसरले आहे.