गुराख्यावर घातली बिबट्याने झडप; म्हशीने शिंगे रोखून वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 02:23 PM2021-08-14T14:23:45+5:302021-08-14T14:24:33+5:30
Bhandara News पाळीव जनावरांनी मनुष्याचे प्राण एखाद्या संकटातून वाचवल्याच्या घटना सिनेमात दाखवल्या जातात. अशाच प्रकारची, म्हशीने आपल्या शिंगांचा धाक दाखवून गुराख्याला बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यातून वाचवल्याची घटना मोहाडी तालुक्यात घडली आहे. (leopard attack on man)
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: पाळीव जनावरांनी मनुष्याचे प्राण एखाद्या संकटातून वाचवल्याच्या घटना सिनेमात दाखवल्या जातात. यात विशेषत: कुत्री, मांजरी वा अन्य पाळीव पशूंचा समावेश असतो. अशाच प्रकारची, म्हशीने आपल्या शिंगांचा धाक दाखवून गुराख्याला बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यातून वाचवल्याची घटना मोहाडी तालुक्यात घडली आहे.
कांद्री वनपरिक्षेत्रातील फुटाळा (वाडा) जवळील नागदेव जंगल परिसरात शुक्रवारी म्हशी चारायाल नेलेल्या बालचंद संपत राऊत (४५) याच्यावर हा प्रसंग गुदरला. नेहमीप्रमाणे तो आपली जनावरे चरायला घेऊन गेला होता. अचानक एका बिबटने त्याच्या एका गायीवर हल्ला केला. बालचंदने आरडाओरडा सुरू करताच बिबटने गायीला सोडून बालचंदवर झेप घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. बालचंदवर झालेला हल्ला पाहून तेथील एका म्हशीने आपली शिंगे रोखत बिबटच्या दिशेने चाल सुरू केली. ते पाहताच बिबटने बालचंदला सोडले व तो जंगलात पसार झाला. गावकऱ्यांनी बालचंदला रुग्णालयात दाखल केले.