वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट झाला ठार; भंडारा वन परिक्षेत्रातील घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 12, 2023 06:11 PM2023-10-12T18:11:55+5:302023-10-12T18:12:29+5:30

भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा सतत वावर

leopard killed in tiger-leopard fight; Incidents in Bhandara Forest Zone | वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट झाला ठार; भंडारा वन परिक्षेत्रातील घटना

वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट झाला ठार; भंडारा वन परिक्षेत्रातील घटना

भंडारा : भंडारा वन परिक्षेत्रातील वाघबोडी तलावाजवळ जंगलात वाघ आणि बिबट्याची थरारक झुंज झाली. दोघेही एकमेकांवर तुटून पडले. त्वेषाने लढले. अखेर या लढाईत बिबट्या ठार झाला. 

भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत मालिपार बीटामधील वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात कक्ष क्रमांक २१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना गुरूवारी दुपारनंतर एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वरीष्ठांना सूचना दिल्यावर भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक चौकशी केली असता बिबट्याच्या मानेवर दोन सुळ्यांचे निशाण दिसून आले. यावरून दोघांच्या झुंजीत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सायंकाळ झाल्यामुळे बिबट्याच्या शवाचे विच्छेदन होऊ शकले नाही. गडेगाव वन विभागाच्या डेपोमध्ये त्याचे शव आणण्यात आले असून शुक्रवारी सकाळी विच्छेदन केले जाईल, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा सतत वावर वाढला आहे. अनेकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ दिसला आहे. या परिसरात बिबट्यांचाही वावर आहे. यातूनच बिबट्याची येथील निवासी वाघाशी झुंज होऊन त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: leopard killed in tiger-leopard fight; Incidents in Bhandara Forest Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.