बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 23, 2023 08:24 PM2023-10-23T20:24:25+5:302023-10-23T20:25:54+5:30

वन विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई

Leopard organ smuggling: Two accused caught red-handed; Possession of nails, bones | बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात

बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात

गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: बिबटाची नखे आणि हाडांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्यांच्याकडून बिबट्याची तीन नखे आणि हाडे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईमुळे वन्यप्राण्यांच्या अवयवाच्या तस्करीचे तार मोहाडीसारख्या भागात जुळून असल्याचे प्रथमच उघडकीस आले आहे.

अटक करण्यातआलेल्या आरोपींमध्ये संजय डोंगरे व आशिष डोंगरे यांचा समावेश असून ते दोघेही जांब (कांद्री, ता.मोहाडी) येथे राहणारे आहेत. भंडारा वनक्षेत्रात बिबटाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती २२ ऑक्टोबरला वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे व सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनी वन कर्मचाऱ्यांसह सापळा पथक तयार केले. या सापळा पथकातील बनावट ग्राहकाने आरोपीशी मोबाईलद्वारे संपर्क करून भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साई प्रसाद हॉटेलमध्ये अवयवासह येण्यास सांगितले. अवयव पाहून आपण सौदा करू, असे सांगितले.

त्यावर विश्वास ठेऊन दोन्ही आरोपी हॉटेलमध्ये पोहचले. ते आल्यावर चचरा सुरू करताच पथकातील दबा धरून असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी बिबटची तीन नखेव हाडांसह आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेली दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कायद्यांतर्गत विविध कलमान्वये वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली. त्यांना सोमवारी न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालया समक्ष हजर करून दोन दिवसाची वनकोठडी मागितली असता मंजूर करण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मेंढे व सचिन निलख करीत आहेत. या कारवाईमध्ये वनपाल अंजन वासनिक, त्र्यंबक घुले, वनरक्षक सचिन कुकडे, डी. बी. आरीकर, पोलिस हवालदार पराग भुते, तुकाराम डावखुरे, प्रफुल खोब्रागडे, शरीन शेख यांचा सहभाग होता.

Web Title: Leopard organ smuggling: Two accused caught red-handed; Possession of nails, bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.