बिबट्याचा सोंड्या शिवारात धुमाकूळ; जंगलशेजारील गावांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 03:51 PM2021-12-07T15:51:07+5:302021-12-07T16:00:46+5:30
जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. गावातील शेळ्या बिबट्या दररोज येऊन फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे.
भंडारा : गेल्या आठवडाभरापासून सोंड्या गावशिवारात बिबट्याने शेळ्या व कुत्र्याची शिकार केली आहे. जंगल शेजारील गावात बिबट्याने धुमाकूळ माजविला आहे. सायंकाळ होताच घराच्या बाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. वन विभागाच्या यंत्रणेने उपाययोजना करण्याची मागणी जंगलशेजारील गावातील नागरिकांनी केली आहे.
सिहोरा परिसरात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा घनदाट जंगल विस्तारित असल्याने वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. चांदपूरचे जंगल रामटेकपर्यंत विस्तारित असल्याने जंगलात वन्य प्राण्यांची रेलचेल आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचे जंगलात वन्य प्राण्यांच्या संख्येत मोठ्याने वाढ झाली आहे.
या जंगलात वाघ, अस्वल आणि बिबट्याचे संख्येत वाढ झाली आहे. जंगलाशेजारी असणाऱ्या मुरली गावात वाघ, बिबट्याचे दर्शन रोज नागरिकांना होत आहे. या हिंस्त्र प्राण्यांनी गावातील शेळ्या, कुत्र्यांची शिकार करण्यास सुरुवात केली आहे. घराच्या अंगणात असणाऱ्या शेळ्या ठार करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. शेळ्याची शिकार बिबट्याने केल्याचे प्रत्यक्षात अनेकांनी बघितले आहे. यामुळे जंगलशेजारील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. रोज बिबट्या गावात दाखल होत आहे. यानंतर गणेश लांजे यांच्या घरी असणारी शेळी रात्रीच्या सुमारास ठार केली आहे. दररोज गावातील एक शेळी बिबट्या फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे.
सोमवारच्या रात्री गावातील वनवास तांडेकर यांच्या घराच्या अंगणात असणाऱ्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली. एकापाठोपाठ गावातील प्राण्यांची बिबट्याने शिकार केली आहे. सायंकाळ होताच बिबट्याच्या दहशतीने नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे. जंगलाच्या शेजारी असणाऱ्या सक्करधारा गावात बिबट्याने धुमाकूळ माजविला आहे. या गावात बिबट्याने अनेक शेळ्या, बकऱ्या व अन्य प्राण्यांची शिकार केली आहे.
गावात आदिवासी बांधवांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असून त्यांचा उदरनिर्वाह पशुपालन व्यवसायावर आहे. बिबट्याच्या दहशतीने पशुपालन व्यवसाय धोक्यात आलेला आहे. जंगलात जनावरांना चराईकरिता नेताना भीती निर्माण झाली आहे. नागरिकांचे जंगलात जाणे बंद झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची ओरड नागरिकांनी केली आहे.