शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:52 AM2019-08-19T00:52:41+5:302019-08-19T00:53:10+5:30
कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा कोसरा : कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
सध्या पवनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोंढा परिसरात धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विष्णू शेंडे यांच्या कडे साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी कालव्याच्या पाण्याने रोवणी केली होती. अतिवृष्टीत धानपीक पाण्याखाली आहे. त्यामुळे तो विवंचनेत होता. कुटुंबात आई, पत्नी व एक मुलगा आहे. दोन मुलीचे लग्न झाले. त्यांचे कर्ज त्यांच्यावर आहे. यावर्षी विविध सेवा सहकारी संस्था, कोसरा येथून आई व पत्नी यांच्या नावाने ३६,५०० रुपये पीककर्ज घेतले. धान पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ते वाहून जाईल या विवंचनेत होते.
कुटुंबाचा प्रमुख अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आले आहे. १४ आॅगस्टला त्याचा मृतदेह अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी कोसरा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
चार दिवस लोटले पण महसूल विभागाचा साधा कर्मचारी अथवा अधिकारी कुटुंबाची भेट घेण्यास येऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या मृत्यूला प्रशासन गंभीरपणे घेत नाही. म्हणून प्रशासनाबद्दल गावात संताप व्यक्त होत आहे.