डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ
By admin | Published: July 18, 2015 12:40 AM2015-07-18T00:40:56+5:302015-07-18T00:40:56+5:30
एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता.
भंडारा : एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता. अन् भरमसाट डोनेशन देऊन देखील डीएडला प्रवेश मिळत नव्हता. आता चित्र बदललेले आहे. या क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असल्याने आता संस्थाचालकांना ‘कुणी प्रवेश घेता का प्रवेश’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. डीएडची जिल्ह्याची प्रवेशक्षमता मोठी असली तरी देखील विद्यार्थ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी थाटलेली काही खाजगी महाविद्यालये आज बंद करून, तिथे व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे विदारक चित्र आहे.
यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी हजारो अर्ज येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांचा हा आकडा मोठा होता; परंतु विद्यार्थी मिळत नसल्याने अनेकांनी थाटलेली दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे आजघडीला मोजके महाविद्यालये शिल्लक आहेत. काही संस्थाचालकांनी त्या इमारतीत अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. विद्यार्थी शोधण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सांगून वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. तरीही विद्यार्थी येण्यासाठी तयार नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले.
पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. कमी खर्चात व कमी वयात नोकरी मिळत होती. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात तर बारावी उत्तीर्ण झाले की, प्रत्येक जण डीएडचाच विचार करीत होता. पैसे नसले तर शेती विकूनही प्रवेश घेतला जात होता. सरकारी नोकरी असल्याने, लग्नात हुंडाही मिळत असे. त्यामुळे गेलेला पैसा वसूल होत होता. त्यामुळे सर्वांचाच ओढा याकडे वाढत गेला. विद्यार्थ्यांचा मोठा ओढा व त्यातून भरमसाट शुल्क मिळत असल्याने, संस्थाचालकांनी ठिकठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली.
त्यामुळे दरवर्षी हा अभ्यासक्रम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. भरती नसल्यामुळे मागील पाच ते सहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम केलेले हजारो तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. काही जणांनी संस्थेत पैसे भरले आहेत; परंतु अनुदान नसल्याने पगार मिळत नाही. त्यामुळे आजघडीला पोट भरण्याचाही त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यातील काही जण दिवसा शाळेत नोकरी करून, रात्रीला अन्य ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. काहींचे नोकरी नसल्याने लग्न जुळण्यासाठी अडचणी येत आहेत. या बेरोजगारांनी आपल्या भावना शासनाला वेळोवेळी कळविल्या. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे अनेकांना आपले पदवी शिक्षणही पूर्ण करता आले नाही. पदवी पूर्ण करून तरी अन्य परीक्षा देता येतात. अशा दुहेरी कचाट्यात हे बेरोजगार सापडलेले आहेत. (नगर प्रतिनिधी)
पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. डीएड केले की हमखास नोकरीची हमी होती. त्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी पूर्वी मोठी स्पर्धा असायची; परंतु शासनाने अलिकडे ही भरतीच थांबविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.
- अभय परिहार, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा.
डीएडकडे विद्यार्थी यायला तयार नाहीत. शासनाच्या विविध शाळांत आजही अनेक जागा रिक्त आहेत; परंतु आपल्यावर आर्थिक बोजा येऊ नये. त्याकरिता जागा भरण्यात येत नाही. इंजिनिअरिंगसह अन्य अभ्यासक्रमांना ३५ टक्क्यांवरही प्रवेश दिला जातो. मात्र, डीएडसाठी आजही ५० टक्क्यांची अट आहे. त्यामुळे हेही विद्यार्थी न मिळण्याचे एक कारण आहे.
- प्रा नरेश आंबिलकर, भंडारा.