केरकचऱ्यापासून होणार खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:52 PM2018-09-09T21:52:30+5:302018-09-09T21:52:48+5:30
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकलन करून त्यातून आता खतनिर्मिती केली जाणार आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकलन करून त्यातून आता खतनिर्मिती केली जाणार आहे.
भंडारा शहरात दररोज ३० टन कचऱ्याचे संकलन करण्यात येत असते. यात ओला कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून त्यात काही महिन्यांपासून घरोघरी जावून कचरा संकलन करण्याचे कार्य सुरू आहे. मागील वर्षी राज्य शासनाच्या स्वच्छताउपक्रमांतर्गत अनेक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. घंटागाडीचा उपक्रम राबविल्यानंतर भंडारा पालिका प्रशासनाने आता मिनी मालवाहूच्या सहायाने कचरा संकलन करण्याचे कार्य हाती घेतले आहे. महिनाभरापासून दहा मिनी मालवाहू वाहनांच्या सहाय्याने घरोघरी जावून कचरा संकलन केले जाते. शहरात आठ प्रभाग असून ३३ वॉर्ड आहेत. लोकसंख्येच्या मानाने मिनी मालवाहू कचरा संकलन वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी होती. याअंतर्गत अजून सहा मिनी मालवाहू वाहनांचे आॅर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय शहरात दररोज दहा ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन केला जातो.
जमनी येथे डम्पिंग यॉर्ड
शहरालगत असलेल्या जमनी येथे शहरातील संकलित केलेला सर्व कचरा संकलित करण्यात येतो. यापूर्वी हा कचरा शहराच्या पूर्व-दक्षिण सोमेवर असलेल्या बैलबाजारा नजिकच्या बायपास मार्गाच्या कडेला फेकण्यात येत होता. दीड दशकांपूर्वी जमनी येथे लक्षावधींचा खर्च करून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला होता. पंरतू याकडे दुर्लक्ष झाल्याने येथे असलेल्या मशिन्स भंगारावस्थेत तर वास्तू शोभेच्या वास्तू ठरल्या होत्या. यावर पालिका प्रशासनाने उपाययोजना आखली. आता ५ कोटी २० लक्ष रूपये खर्च करून खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार असून यासंदर्भात लवकरच कामालाही प्रारंभ होणार आहे.