राफेल घोटाळ्याचा पर्दाफाश करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:42 AM2018-09-07T00:42:25+5:302018-09-07T00:43:00+5:30
राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथे मोर्चा काढणार असून येथूनच भाजप सरकारचा पर्दाफाश करु, अशी माहिती माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
गुरुवारी दुपारी ३ वाजता आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले, राफेलच्या करारसंदर्भात काँग्रेस शासनाच्या वेळी विमान ५२४ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचा सौदा झाला होता. परंतु विद्यमान स्थितीत मोदी सरकारने हा करार १६७० कोटी रुपयांमध्ये केला. उद्योगपती मित्रांना लाभ देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी ही बाब गोपनीय असल्याचे सांगतीले होते. मात्र फ्रान्सने यात कुठलेही गोपनियता नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा सर्व भाजप सरकारतर्फे दिशाभुल करण्याचा प्रयत्न आहे. रॉफेल प्रकरणाचा पर्दाफाश करु असेही पटोले म्हणाले.
पेट्रोल व डिझेल अन्य देशाना अनुक्रमे ३६ व ३४ रुपये लिटर दराने निर्यात केले जाते. मात्र भारतात तेच पेट्रोल व डिझेल अनुक्रमे ८७ व ७८ रुपये लिटर दराने विकले जात आहे. हा नागरिकांचा खिशे कापण्याचा सर्रास प्रकार आहे. शेतीच्या हमीभावाबाबतही भाजप सरकारने निवडणूकपूर्वी व नंतर अशा दोन्ही वेळी भाव वाढीची आश्वासन दिले होते. ते आश्वासनही पुर्ण झाले नाही.
महिलांच्या अस्मितेचा मुद्दा समोर करुन माजी खा. पटोले म्हणाले, आमदार रामकदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या समारंभातच महिलांचा सर्रास अपमान केला. काँग्रेस असा प्रकार कदापी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत मौन घेतल्याने या बाबीला त्यांचा पाठींबा आहे काय? असा टोला ही पटोले यांनी लगावला.
महिलांचा अपमान करण्याचा मानस भाजप व संघाने उचलला आहे काय? असा सवालही त्यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्काही लागू देणार नाही, अशी खंबीर भुमिका ही पटोले यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट करतांना पटोले म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुचनेनुसार भाजप शासनाच्या धोरणाविरुध्द १८ सप्टेंबरला भंडारा येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्वस्तरातील पिडीत नागरिकांसह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारपरिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुडघे पाटील, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचिव जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, भंडारा जिल्हा प्रभारी सुरजित पठाण, तालुकाध्यक्ष राजकपुर राऊत, शहराध्यक्ष सचिन घनमारे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.