धानासाठी प्रकल्पाचे पाणी न सोडल्यास स्वत: गेट उघडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:41+5:302021-07-18T04:25:41+5:30
भंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतातील पऱ्हे वाळत असून रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग ...
भंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतातील पऱ्हे वाळत असून रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग मात्र सिंचनासाठी पाणी सोडत नाही. भंडारा विधानसभा क्षेत्रातील प्रकल्पाचे पाणी ४८ तासांत सोडले नाही तर आपण स्वत: शेतकऱ्यांसोबत सर्व गेट उघडू, असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.
भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. अत्यल्प पावसाने पऱ्हे वाळायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रोवणी खोळंबली आहे. रोवणी उलटण्याची भीती काही ठिकाणी दिसून येत आहे. कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत. अनेकजण वीज बिल भरू शकले नाही. त्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा स्थितीत गोसे धरणावरील उपसा सिंचन योजनांचे पाणी मिळावे यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. शेतकऱ्यांची ही स्थिती पाहता आमदार भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ४८ तासांत पाणी सोडले नाही तर सर्व उपसा सिंचन योजनेचे गेट आपण स्वत: उघडू, असा इशारा दिला आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रातील करचखेडा, टेकेपार, सुरेवाडा या उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. तसेच गोसे प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्याद्वारे पाणी मिळण्याची प्रतीक्षा आहे.