परवाना दुकाने बंद; अवैध दारूचा महापूर

By Admin | Published: June 20, 2017 12:22 AM2017-06-20T00:22:01+5:302017-06-20T00:22:01+5:30

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून ...

License shops closed; Drunkenness | परवाना दुकाने बंद; अवैध दारूचा महापूर

परवाना दुकाने बंद; अवैध दारूचा महापूर

googlenewsNext

तंटामुक्त गाव मोहीम थंडावली : मोहीम वृद्धीगंत करण्याबाबत शासन उदासीन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. परंतु परवानाप्राप्त देशी विदेशी दारूची दुकाने बंद झाल्याने आता गावागावात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे. पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करीत असली तरी या कारवाईला न जुमानणारे वास्तव अवैध दारूविक्रीचे आहे.
गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम.आय.एस.१००७/सी.आर.२३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम.आय.एस.१००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. परंतु आता शासनाने राज्य व राष्ट्रीय मार्गावरील व ५०० मीटरच्या आत असलेली सर्व देशी, विदेशी दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात दारू दुकाने बंद झाली. परंतु व्यसनाधिन लोकांचे व्यसन कमी झाले नाही.
परवानाप्राप्त दुकाने बंद झाल्याने गावागावातील प्रत्येक मोहल्यात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे.या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत आहे.
अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. परंतु आता महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अवैध दारूसंदर्भात पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाही. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेला वृध्दीगंत करण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाही. शासनाने तंटामुक्त गावाचे दर तीन वर्षाने पुनर्मुल्यांकण करून त्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यायला पाहीजे होते. परंतु शासनाने तसे न केल्याने या समित्या एकदा पुरस्कार घेतल्यानंतर आता उदासिन झाल्या आहेत. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्या सुरू होत आहेत.
अवैध दारूविक्रीवर हजारो कुटुंब चालत आहेत. अवैध दारूमुळे दररोज सायंकाळी तंटे होत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्या बंद होऊ शकतात. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे.

पोलिसांची दररोज कारवाई
परवानाप्राप्त दारू दुकानांवर सक्रांत आल्याने आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे. या अवैध दारूविक्रेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दररोज गस्त असते. दररोज २५ ते ४० अवैध दारूविक्रेत्यांची दारू पकडली जाते. परंतु कारवाई होऊनही अवैध दारूविक्री बंद होत नाही. आता दारूच्या किंमत वाढल्याने अवैध विक्री जोमात आहे. दारूविकक्रेत्या पुरूषाला पकडून पोलिसांनी ठाण्यात नेले तर त्याची पत्नी घरी दारू विक्री करीत असते. बहुतांश ठिकाणी ही स्थिती कायम आहे. मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री जिल्ह्यात होत आहे. परप्रांतातील नकली दारू जिल्ह्यात येत आहे. कारवाई करूनही विक्री थांबत नाही.

Web Title: License shops closed; Drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.