चिखलमय पांदण रस्त्यातून अनेक शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:12+5:302021-08-21T04:40:12+5:30
नवेगाव येथील केशवराव चकोले यांच्या शेतापासून तेे रामेश्वर चकोले यांच्या शेतापर्यंत पांधण रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र ...
नवेगाव येथील केशवराव चकोले यांच्या शेतापासून तेे रामेश्वर चकोले यांच्या शेतापर्यंत पांधण रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणी, चिखलाचे साम्राज्य आहे. बैलांना चिखलातून बैलबंडी ओढताना निघत नाही. अशातच बैलबंडी चिखलात रुतलेल्या परिसरात जर कोणी शेतकरी नसल्यास त्या शेतकऱ्याला अक्षरशः बैलबंडी तिथेच सोडून चिखलातून पायी जावे लागत आहे. अनेक शेतकरी आपल्या कुटुंबालाच सोबत घेऊन अनेकदा कुटुंबीयांची मदत घेऊन चिखलातून मार्ग काढतात. मात्र याची शासन स्तरावर कोणी दखल घेत नसल्याने अनेक शेतकरी आम्ही कोणता गुन्हा केला की साधा आमच्या शेतापर्यंत रस्ताही मंजूर होत नाही. असा प्रश्न करत आहेत. नवेगाव (बुज) ते खैरी हा पांदण रस्ता दोन गावांच्या शेतांना जोडणारा आहे. या रस्त्यालगत जवळपास ५०० एकर शेती आहे. अनेक शेतकरी दररोज शेतात ये-जा करतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने अनेक बैलबंडी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनेही शेतापर्यंत न्यावी लागतात. चिखलमय रस्त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयाकडे निवेदन देऊनही हा रस्ता तयार होऊ शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामात खते, बियाणे तसेच शेती साहित्य शेतात घेऊन जाण्यासाठी बैलबंडी चिखलातून मार्ग काढताना अक्षरश: बैलांची दमछाक होत आहे. मात्र लोकप्रतिनिधींना मात्र याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. आम्हाला काही नको फक्त पांदण रस्ता चांगला करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बॉक्स
सहा वर्षांपासून ग्रामंपचायतचे दुर्लक्ष
मोहाडी तालुक्यातील नवेगाव(बुज) ते खैरी हा पांदण रस्ता तयार करण्यासाठी ग्रामपंचायतला अनेकदा निवेदन दिले. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी दमछाक दिसूनही ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत आहे. जिल्हा प्रशासन तरी याची दखल घेणार काय असा सवाल शेतकरी करत आहेत. दररोज शेतात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने हा पांदण रस्ता डांबरीकरण अथवा खडीकरणाची मागणी शेतकरी केशवराव चकोले, अण्णा तिबुडे, गजानन माटे, गजानन माटे, रामेश्वर तिबुडे, भास्कर चकोले, परसराम तिबुडे, घनश्याम तिबुडे, उमाशंकर माटे, अमित तिबुडे, राजकुमार चकोले, बाळकृष्ण तिबुडे, विनोद तिबुडे, चुन्नीलाल बावनकर, बबन तिबुडे, क्रिष्णा तिबुडे यांनी केली आहे.