ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:31+5:30

जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात.

Life-threatening journey of schoolchildren in rural areas | ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Next
ठळक मुद्देअपघाताने वास्तव उघड : गावखेड्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा

निश्चित मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनातून शेकडो चिमुकले प्रवास करतात. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे झालेल्या स्कूलबसच्या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये विद्यार्थी पाठविले जातात. बहुतांश शाळांच्या स्कूल बस असल्यातरी त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिवहन विभागाचे स्कूल बस संदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. अनेक शाळांनी तर स्कूल बस ऐवजी छोट्या वाहनातून विद्यार्थ्यांना असुरक्षितपणे ने-आण केली जाते. या वाहनावरील चालकांच्या कौशल्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अनेक वाहनांवरील चालकतर अप्रशिक्षित असतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून नेतात. विद्यार्थ्यांना बसायला जागाही नसते. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे स्कूल बस उलटून ३५ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र या अपघाताने स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाल्याच्या भविष्यासाठी पालक पदरमोड करुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना पाठवितात. शाळेची भरमसाठ फी भरल्यानंतर प्रवासासाठी स्कूल बसचे वेगळे पैसेही भरतात. परंतू आपल्या मुलाच्या सुरक्षेबाबत कोणताही पालक जागृ्रक असल्याचे दिसत नाही. स्कूल बस असल्याने पोलीसही अशा वाहनावर क्वचितच कारवाई करतात. मुलांच्या वाहनावर कशाला कारवाई म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेतात. यामुळेच अशा स्कूल बसचे चांगलेच फावते.
स्कूल बससोबतच अनेक विद्यार्थी एसटी महामंडळाने प्रवास करतात. सवलतीचा पास काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येतात. परंतू त्यांना दररोज बसमध्ये उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अनेकदा रात्री उशिरापर्यंत बस मिळत नसल्याने थांब्यावरच थांबून राहावे लागते. विद्यार्थीनींचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
मानवविकास मिशनच्या बसेस असल्या तरी त्याचा उपयोग प्रवाशांसाठीच केला जातो. यामुळे विद्यार्थी दुर्लक्षीतच राहतात. जिल्ह्यातील सर्व स्कूल बसचे आॅडीट करुन सुरक्षेची खातरजमा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
विद्यार्थीनींची मोफत पास बंद
पहिली ते बारावीपर्यंत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेमार्फत मोफत एसटी बस पास दिली जात होती. त्यामुळे अनेक मुली बाहेरगावी जावून शिक्षण घेत होत्या. परंतु गत वर्षभरापासून ही पास बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित आहे. पालकांनी मुलींना शहरी भागात पाठविणे बंद केले आहे. ही योजना सुरु करावी अशी मागणी या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष
स्कूल बस संदर्भात परिवहन विभागाचे कडक नियम आहेत. या नियमांच्या अधिनराहूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागते. परंतू ग्रामीण भागातील स्कूल बस सर्व नियम पायदळी तुडवत प्रवास करतांना दिसतात. स्कूल बससोबत शालेय विद्यार्थी वाहतूकीचा परवाना नसलेले वाहनेही विद्यार्थ्यांची ने-आण करतांना दिसतात. आॅटोरिक्षांमध्ये तर विद्यार्थी अक्षरश: कोंबून असतात.

आपल्या मुलाला कुठे शिकवावे. हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पालकाने लक्ष देण्याची गरज आहे. शाळा व्यवस्थापनाने केवळ पैसे कमविण्याच्या नादात चिमुकल्याचे भविष्य हिरावून घेवू नये. स्कूल बसची तपासणी करावी.
- बाळू फुलबांधे
शिवसेना विधानसभा प्रमुख

विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर
कोंढा-कोसरा : सेंद्री खुर्द गावाजवळ झालेल्या स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी विद्यार्थी आणि कर्मचारी यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. भंडारा येथील खाजगी रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे. कोंढा येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या बसला अपघात होऊन ३५ विद्यार्थी व चार कर्मचारी जखमी झाले होते. गंभीर जखमी मानसी चिलमकर (४) हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर मयुरी उपरिकर (९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली होती. या दोघांवर भंडारातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कर्मचारी सुषमा नंदागवळी, संध्या गिरडकर यांच्यावरही उपचार सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शक जमादार सुभाष मस्के करीत आहे.

Web Title: Life-threatening journey of schoolchildren in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात