एकाला आजीवन तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:22 PM2018-06-29T22:22:27+5:302018-06-29T22:22:51+5:30
एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
अमिर एजाज शेख या आरोपीला भादंवि ३०७ कलमान्वये आजन्म कारावास तर सचिन कुंडलीक राऊत या आरोपीला भादंवि ३९७ कलमान्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
३० जुलै २०१५ रोजी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख व सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायम अपंगत्व आले आहे.
त्याच रात्री ८ वाजताच्या सुमारास या आरोपीनी तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. दरम्यान, तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केल्यामुळे त्यालाही अपंगत्व आले आहे.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक करून आरोपींविरूद्ध भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे नोंदविले होते. तपासात पोलिसांनी दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारला झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी अश्विनी शिंदे प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा तर प्रीती बारिया खून प्रकरणात दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची सुनावणी शनिवारला करण्यात येणार आहे. शनिवारच्या अंतिम निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
प्रीती बारिया खून प्रकरणाची सुनावणी आज
प्रीती बारिया या बहुचर्चित खून खटल्यात आरोपींविरूद्ध आज शुक्रवारला झालेल्या युक्तीवादात दोष सिद्ध झाले. आता या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी प्रीती बारिया यांचा खून केला होता. त्यापूर्वी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या महिलेचा याच आरोपींनी खून केला होता. या जीवघेणा हल्ल्यात अश्विनी शिंदे व भव्य बारिया या मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अश्विनी व भव्यला आयुष्यभर या असह्य वेदना सहन कराव्या लागणार आहेत. या दोघांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी लाखो रूपये खर्च करूनही हे दोघे आजवर सामान्य स्थितीत आली नाहीत. त्यामुळे या क्रूर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होत आहे, अशी मागणी होत आहे.