बनावट दस्ताऐवजाच्या आधारावर कृषी अवजाराची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:17+5:302021-02-13T04:34:17+5:30
लाखांदूर: शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेती कार्यक्रमांतर्गत यांत्रिकीकरण घटकासाठी राबविण्यात आलेल्या योजनेत एका शेतकऱ्याने बनावट दस्तऐवजाचे आधारावर कृषी अवजाराची ...
लाखांदूर: शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेती कार्यक्रमांतर्गत यांत्रिकीकरण घटकासाठी राबविण्यात आलेल्या योजनेत एका शेतकऱ्याने बनावट दस्तऐवजाचे आधारावर कृषी अवजाराची उचल केल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी लाखांदूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली असून सदर गैरप्रकार तालुक्यातील चिकना येथे घडल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. गणेश सोनपिंपळे रा.चिकना असे तक्रारदाराचे तर ज्ञानेश्वर हरिश्चंद्र कांबळे रा.चिकना असे बनावटगिरी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, शासनाच्या तालुका कृषी विभागांतर्गत सन २०१७-१८ यावर्षी शासनाच्या तालुका कृषी विभागांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेती कार्यक्रमांतर्गत यांत्रिकीकरण घटकासाठी योजना राबविण्यात आली. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या अर्जानुसार ट्रॅक्टर यंत्र व अवजारे किमान ६० टक्के अनुदानावर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सोडत काढून देण्यात आले. तथापि, या योजनंतर्गत ट्रॅक्टर यंत्राच्या रोटावेटर या अवजाराच्या लाभासाठी घटनेतील बनावटगिरी करणाऱ्या शेतकऱ्याकडे मालकी ट्रॅक्टर नसतानादेखील बनावट आर.सी. पुस्तिकच्या आधारावर रोटावेटर अवजाराची उचल केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
सदर प्रकरणी तालुक्यातील चिकना येथील घटनेतील तक्रारदाराने ११ फेब्रु.रोजी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार करुन चौकशी व कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे.