घरकुलाचे बांधकाम न करताच केली अनुदानाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:33+5:302021-05-08T04:37:33+5:30
लाखांदूर : शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करता लाभार्थी ग्रामसेवक व रोजगार सेवकाने संगनमताने शासन, प्रशासनाची दिशाभूल ...
लाखांदूर :
शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करता लाभार्थी ग्रामसेवक व रोजगार सेवकाने संगनमताने शासन, प्रशासनाची दिशाभूल करीत चक्क दोन धनादेशाची उचल केल्याची खळबळजनक माहिती आहे. सदर घटना तालुक्यातील मांढळ येथे उघडकीस आली असून या घटनेत दोषी लाभार्थ्यांसहित अधिकारी कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांत केली जात आहे.
माहितीनुसार, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २०२० - २१ अंतर्गत तालुक्यातील मांढळ येथील अंजना गोविंदा नंदनवार नामक लाभार्थी महिलेला घरकूल मंजूर करण्यात आले. सदर मंजुरी अंतर्गत शासनाकडून अग्रीम २० हजार रुपयांचा निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. सदर निधींतर्गत लाभार्थ्याला घरकुलाच्या पायाचे बांधकाम करावयाचे होते. मात्र लाभार्थ्याने पायाचे बांधकाम केले नाही.
लाखांदूर पंचायत समितींतर्गत घरकूल बांधकाम योजनेचे अभियंता गजभिये संबंधित महिला लाभार्थ्याच्या घरकुलाच्या पायाचे बांधकाम पाहावयास गेले असता लाभार्थी महिलेच्या कुटुंबीयांनी गावातीलच अन्य एका लाभार्थ्याच्या घरकूल बांधकामाचा पाया दाखवून दुसऱ्या हप्त्याच्या निधीची मागणी केली. त्यानुसार अभियंता गजभिये यांनी स्थानिक ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र मागवीत दुसऱ्या हप्त्याचे अनुदान निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले.
दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत घरकूल बांधकाम होताना अकुशल कामाअंतर्गत दिली जाणारी देयकेदेखील लाभार्थ्याला देण्यात आल्याची माहिती आहे. या संबंधित घटनेत लाभार्थी, ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी शासन, प्रशासनाची संगनमताने दिशाभूल करून घरकुलाचे बांधकाम न करता जवळपास ८० हजार रुपयांचा निधी उचल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन घरकुलाचे बांधकाम न करता शासन, प्रशासनाची संगनमताने दिशाभूल करून अनुदानाची उचल केल्याप्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
चौकशी करून दोषीविरोधात कारवाई करणार
बीडीओ
घरकुलाचे बांधकाम न करता शासन, प्रशासनाची दिशाभूल करून शासन निधीची उचल केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ प्रमोद वानखेडे यांनी दिली.