काळेकुट्ट ढग आकाशी ; पण पाऊसच नाही
By Admin | Published: August 20, 2016 12:24 AM2016-08-20T00:24:22+5:302016-08-20T00:24:22+5:30
आकाशात काळेकुट्ट ढग दिवसरात्र गर्दी करीत आहेत. ढगांकडे टक लावून बघितल्यास मनात आस होते की, नक्कीच पाऊस पडेल.
दुष्काळाचे सावट : रोवणी पडली पिवळी, उत्पन्नावर परिणाम
मुखरू बागडे पालांदूर
आकाशात काळेकुट्ट ढग दिवसरात्र गर्दी करीत आहेत. ढगांकडे टक लावून बघितल्यास मनात आस होते की, नक्कीच पाऊस पडेल. पण मंद वाऱ्याच्या साथीने ढग पुढे पुढे सरकतात. मनातली आशा मनातच विरते. ५-१० थेंब जमिनीवर निसर्गराजा शिंपडतो. यालाच पावसाळा मानायचे काय, असा संतप्त प्रश्न बळीराजाच्या मुखातून निघत आहे.
पावसाळ्याचे दिवस असतानाही निसर्ग कोपल्याने पावसाने दडी मारली आहे. यामुळे रोवणी पिवळी पडली आहे. तर जिथे रोवणी पूर्ण झाली त्या शेतात निंदन भरपूर झाले आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.
जून, जुलै महिना सुरू असतानाही अल्पसा पाऊस पडला. आॅगस्ट महिन्याचा मध्यान्ह निघून गेला. तरीपण पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. पालांदूर परिसरात जून महिन्यात ९३ मि.मी., जुलैमध्ये ४१८ मि.मी. तर आॅगस्ट मध्ये ६१.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. रोवणी झालेल्या धानाला पाणी नसल्याने निंदन भरघोष येत आहे. रोवणीला खर्च तीन हजार तर निंदनाला तीन हजाराच्या वर खर्च बळीराजाला येत आहे. मजूर मिळेनासे झाले आहे.
पाऊसच नसल्याने किटकनाशक फवारणीकरीता बांध्यात पाणी नाही. शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला असून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरड्या दुष्काळाचे कालचक्राचे आर्थिक संकट यावर्षीही सहन करावे लागणार आहे. मागील वर्षी पालांदूर परिसरात आणेवारी ५० पैशाच्या आत असूनही बिमा मिळालेला नाही. प्रशासनाने केवळ भुलथापा दिले आहेत. बहुप्रतिक्षीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून वगळल्याने नुकसान आणखी वाढणार आहे. पावसाने दीर्घ उसंती घेतली तर दुष्काळाचे सावट नक्कीच आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असले तरी अनेक ठिकाणचे जलसाठे अत्यल्पच आहेत. यावरूनच पाणी समस्या दिवसागणिक डोके वर काढीत आहे. या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशा पल्लवीत होतील, अन्यथा कजाखाली बळीराजाला जीवन कंठावे लागणार आहे.
किटाळी, ईसापूर, गुरठा, पालांदूर, खराशी हलक्यात सहा हजार ८६८ हेक्टरमध्ये खरीप धान हंगाम नियोजित आहे. पाच हजार ५१४ हेक्टरमध्ये रोवणी तर एक हजार ५० हेक्टरवर आवत्या पेरणी केली आहे. ९० टक्के रोवणी आटोपली असून पावसाची गरज आहे.
-टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.