पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:28 PM2023-06-23T12:28:06+5:302023-06-23T12:29:21+5:30
लाखनीतील मऱ्हेगावात घरावर कोसळली वीज, कुटुंब बचावले
भंडारा : पावसाळ्यातील पहिल्याच पावसात विजेने कहर केला. जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. यात भंडारा तालुक्यातील नवेगाव शेतशिवारात चरणाऱ्या पाच बकऱ्या ठार झाल्या, तर दोघे मेंढपाळ बचावले. दुसऱ्या घटनेत लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथे नकटू वातू शेंडे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली. यावेळी सर्व कुटुंबीय घरातच होते. सुदैवाने घराच्या कोपऱ्यावर निभावले.
जिल्ह्यात दुपारी १ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत मोठ्या प्रमाणावर मेघगर्जनाही होत होत्या. अशातच, गुजरातमधील भूज येथे राहणारे मेंढपाळ कुटुंब शहापूर नवेगावच्या शेतशिवारावर मुक्कामी आहे. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान विजेचा जोरदार कडकडाट होऊन चरणाऱ्या बकऱ्यांवर वीज कोसळली. यात पाच बकऱ्या ठार झाल्या. मसरू लक्ष्मण रबारी (वय ४०) असे या मेंढपाळाचे नाव असून त्यांच्या मालकीच्या सुमारे सव्वालाख रुपये किमतीच्या तीन बकऱ्या ठार झाल्या, तर पांढररकवडा येथील मो. जावेद मो. दस्तगीर यांच्या मालकीचे दोन बोकड ठार झाले. यात त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
नशिब बलवत्तर म्हणून..
यावेळी मसरू रबारी आणि त्यांचा सहकारी लाखा रबारी (वय ४३) जवळच उभे होते. सुदैवाने या दुर्घटनेतून ते बचावले. या प्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मऱ्हेगावात राहत्या घरावर वीज पडली
यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथे नकटू वातू शेंडे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली. ही घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यात घराचा कोपरा क्षतीग्रस्त झाला. तसेच इलेक्ट्रिक साहित्य व घरातील इतर वापराच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. जीवितहानी टळली.
दुपारनंतर या परिसरात विजांच्या कडकडासह पावसाने जोमदार हजेरी लावली. कडकडाटादरम्यान मऱ्हेगाव येथील शेतकरी परिवारातील नकटू वातू शेंडे यांच्या राहत्या घरावर वीज पडली. ही घटना घडली तेव्हा सर्वच मंडळी घरात उपस्थित होती. पशुधन सुद्धा अंगणातच गोठ्यात बांधले होते. वीज घराच्या कोपऱ्यावर पडली. त्यामुळे घराच्या वरचा भाग खचला. धान ठेवण्याच्या बखारीला तडा गेला. इलेक्ट्रिक वायरिंग, वीज बोर्ड, पंखे, कूलर व दूरदर्शन संच तसेच इतर विद्युत साहित्य निकामी झाले. पंचनाम्यात शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांपर्यंतचे नुकसान नोंदविण्यात आले. महसूल कर्मचारी (कोतवाल) सुभाष खंडाईत यांनी तत्काळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
गतवर्षीही मंदिरावर पडली होती वीज
गतवर्षीसुद्धा मऱ्हेगाव येथील हनुमंत मंदिराच्या घुमटावर वीज पडून मंदिराचे मोठे नुकसान झाले होते, हे विशेष! आज झालेल्या दुर्घटनेमुळे गतवर्षीच्या घटनेची आठवण मऱ्हेगावासीयांना ताजी झाली.
अनेक ठिकाणी गेली वीज
पहिल्या पावसातच वीज मंडळाचा कारभार दिसून आला. भंडारा शहरासह अनेक ठिकाणी वारंवार वीज गेली. दुरुस्तीचे काम पावसातही सुरू असले तरी अनेक ठिकाणी जवळपास तीन तास विजेचा पत्त नव्हता. आधीच असलेला उकाडा व त्यात वीज गेल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.