भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांचे तांडव; नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:45 AM2023-07-22T10:45:21+5:302023-07-22T10:45:44+5:30

शेतकरी- शेतमजुरांचा समावेश, जनावरेही दगावली

Lightning strikes in Bhandara, Gondia district; Five people died, 25 injured in nine incidents | भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांचे तांडव; नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांचे तांडव; नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

googlenewsNext

भंडारा / गोंदिया :भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांनी अक्षरक्ष: तांडव घातले. दोन्ही जिल्ह्यांत वीज कोसळण्याच्या नऊ घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले. जखमींमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश आहे. 

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी एकापाठोपाठ वीज कोसळण्याच्या सहा घटना घडल्या. दोन घटनांमध्ये दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. तीन महिला मजूर जखमी झाल्या. अन्य दोन घटनांत चार शेळ्या दगावल्या. पाचव्या घटनेत सिलेगाव येथील मंदिरावर वीज कोसळली, तर गुरुवारी दुपारी वीज पडून पवनी तालुक्यातील चिचाळ या गावातील २२ शेतमजूर जखमी झाले. त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

मोहाडी तालुक्यातील नीलज खुर्द शिवारात शुक्रवारी सूर्यप्रकाश बोंदरे यांच्या शेतात लगतच्या नवेझरी गावातील महिला मजुरांकडून रोवणीचे काम सुरू होते. दुपारी २:३० च्या दरम्यान मजूर जेवण करीत असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत लताबाई मनोहर वाढवे (वय ५०) व बच्छला बावनथडे (५०) दोन महिला ठार झाल्या; तर सुलोचना लालाजी सिंगनजुडे (५५), बेबीबाई मुकुंदा सय्याम (५५) व निर्मला रामकृष्ण खोब्रागडे (५०), गीता या जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना भंडारातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरी घटना मोहाडी तालुक्यातील बोंद्री येथे घडली. कांद्री येथील शेतात युवराज दामा भिमटे या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू झाला. तिसरी घटना तुमसर तालुक्यातील रनेरा या गावात दुपारी तीनच्या दरम्यान घडली. छोटेलाल पारधी यांच्या शेतात वीज कोसळून जवळच चरणाऱ्या तीन बकऱ्या ठार झाल्या. सुदैवाने रोवणीच्या कामावरील मजूर थोडक्यात बचावले. साकोली तालुक्यातील जमणापूर येथील रहिवासी चंद्रशेखर पाचे यांच्या घरामागील मोकळ्या जागेत वीज कोसळून एका शेळीचा मृत्यू झाला.

२२ स्त्री-पुरुष मजुरांवर अडळ्यामध्ये उपचार सुरू

पवनी तालुक्यातील चिचाळ शेतशिवारामध्ये गुरुवारी दुपारी वीज पडली. यामुळे २२ पुरुष व महिला मजूर जखमी झाले. यातील ज्योती काटेखाये (३०) ही महिला गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपूरला दाखल करण्यात आले आहे. अन्य २१ मजुरांवर अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात श्रीकृष्ण काटेखाये, छाया बिलवणे, कविता मोहरकर, रूपचंद बिलवणे, देवचंद बिलवणे, ज्ञानेश्वर बिलवणे, विजय मोहरकर, प्रमिला काटेखाये, दीपमाला बिलवणे, रुखमा बिलवणे, संगीता नखाते, शालू भुरे, गीता बिलवणे, राजू मोहरकर, सुषमा बिलवणे, सुनीता मोहरकर, सुनीता बिलवणे, ज्योत्स्ना मोहरकर, प्रियंका बिलवणे, रानी काटेखाये आणि विक्की बिलवणे यांचा समावेश आहे.

वीज पडून सुनेचा मृत्यू, सासू- सासरे जखमी...

गोंदिया जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दाेन जण ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यात घडली. ओमदास सखाराम वाघाडे (रा. घाटबोरी, ता. सडक अर्जुनी) व ललिता कैलास राऊत (३५, रा. भोयरटोला, ता. देवरी) अशी मृतांची नावे आहेत. तर, गायत्री दिनेश ठाकरे (३०), फुलन ईशू ठाकरे (३२, रा. सर्रा, ता. तिरोडा), गणेशराम पांडुरंग राऊत (६२), अनुसया गणेशराम राऊत (५५, रा. भोयरटोला, ता. देवरी) ही जखमींची नावे आहेत.

सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथील ओमदास वाघाडे यांच्या शेतात शुक्रवारी रोवणीचे काम सुरू असताना ओमदास वाघाडे यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, दुसरी घटना देवरी तालुक्यातील भाेयरटोला येथे घडली. सून ललिता राऊत (३५), सासू अनुसया गणेशराम राऊत (५५), सासरे गणेशराम पांडुरंग राऊत (६२) हेदेखील शेतात रोवणीचे काम करीत होते. दुपारी दाेन वाजेच्या सुमारास ललिता कैलास राऊत (३४) हिच्या अंगावर वीज काेसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर, सासू- सासरे जखमी झाले. जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिसरी घटना तिरोडा तालुक्यातील सर्रा येथे घडली. शेतात रोवणीचे काम करीत असलेल्या दोन महिलांवर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Web Title: Lightning strikes in Bhandara, Gondia district; Five people died, 25 injured in nine incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.