रोवणी करताना वीज पडली, दोन महिला मजुरांचा मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: July 15, 2024 06:28 PM2024-07-15T18:28:10+5:302024-07-15T18:28:41+5:30
चार महिला जखमी : डोंगरगाव शेतशिवारातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील आठवडाभरापासून पावसाने खंड दिला आहे. अशातच काल पाऊस आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी धानाच्या रोवणीला सुरूवात केली आहे. आंधळगाव पासून ४ किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव शेतशिवारातील नाना सेलोकर यांच्या शेतावर काही महिला मजूर रोवणीच्या कामात व्यस्त होते. दरम्यान दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज पडली. यात आशा सुरेश सोनटक्के आणि कला तुकाजी गोखले या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्या आंधळगाव येथील रहिवासी आहेत. तर, रुखमा बंडू निमजे, मैना पतीराम सेलोकर (दोघीही रा. आंधळगाव) आणि वंदना मधुकर जीभकाटे, निशा जीभकाटे (रा. डोंगरगाव) या चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.