बावनथडी वितरिकांचे अस्तरीकरण निधीअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:45+5:302021-04-04T04:36:45+5:30
बावनथडी प्रकल्पामुळे तुमसर, मोहाडीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सिंचनाची सोय झाली आहे. आंतरराज्य प्रकल्प पूर्ण होण्यास पंचवीस ते तीस ...
बावनथडी प्रकल्पामुळे तुमसर, मोहाडीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सिंचनाची सोय झाली आहे. आंतरराज्य प्रकल्प पूर्ण होण्यास पंचवीस ते तीस वर्षे लागले. वितरकांचे जाळे तयार करण्यात आले. गत तीन वर्षांपासून तुमसर व मोहाडी तालुक्यात सिंचनाचा लाभ होत आहे. परंतु, अनेक वितरिकांचे अस्तरीकरण करण्यात आले नाही. मातीच्या वितरिकेतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे वितरिकेतील माती खचून जाते. त्यामुळे वितरिकांना भगदाड पडल्याचे अनेक ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होते. पाण्याच्या प्रवाहाने पिके वाहून जातात. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे वितरिकांचे अस्तरीकरण करण्याची गरज आहे.
बावनथडी प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात वितरिकांचे जाळे तयार करण्यात आले आहे. सुमारे १०० किलोमीटरपर्यंत वितरिकांचे जाळे पसरलेले आहे. काही ठिकाणी वितरिकांना अस्तरीकरण करण्यात आले. परंतु, त्यात मुख्य वितरिकांचा समावेश आहे. लहान वितरिकेंचे अजून अस्तरीकरण झाले नाही. या सर्व वितरिकांचे अस्तरीकरण करण्याकरिता कोट्यवधींचा निधी लागणार आहे. सिंचनाची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर पाण्याचे थकीत बिल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे असल्याची माहिती आहे.