दारुची बुकिंग फोनवर अन् पाण्याच्या बॉटलमधून पार्सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:01:10+5:30
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घेत दिवसभर दिसून येतात. सुरुवातीला काही लोकांनी केलेला स्टॉक आता संपला असून स्टॉक करणाऱ्यांवरही दारुसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : लॉकडाऊनने खरी पंचाईत झाली असेल तर ती दारुड्यांची. सर्वत्र दारुबंदी असल्याने दारुसाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंतु अशा परिस्थितीवरही मात करणार नाही ते मद्यपी कुठले. अड्याळ परिसरात तर आता दारुची बुकिंग फोनवर केली जाते आणि पाण्याच्या बॉटलमधून घरपोच पार्सल मिळत आहे. तळीरामांची ही शक्कल अद्याप पोलिसांच्या दृष्टीस पडली नसली तरी दारुसाठी कालव्यावर होणारी मद्यपींच्या गर्दीकडे मात्र पोलीस दुर्लक्ष करीत आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घेत दिवसभर दिसून येतात. सुरुवातीला काही लोकांनी केलेला स्टॉक आता संपला असून स्टॉक करणाऱ्यांवरही दारुसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र पोलिसांचा ससेमिरा आणि थेट गुन्हे दाखल होत असल्याने मद्यपींचे पायही दारु न पिता लटलट कापतात. आता त्यावर विक्रेते आणि मद्यपींनी नामी शक्कल शोधून काढली आहे. जंगलात गाळल्या जाणाºया हातभट्टीच्या दारुची बुकींग फोनवरून केली जाते. विक्रेता मिनरल वॉटरच्या बॉटलमधून तात्काळ दारु संबंधितांपर्यंत पोहचवून देते. एक लिटरच्या हातभट्टी दारुसाठी घरपोच सेवेसाठी मोठी रक्कम घेतलीे जाते. हा प्रकार अड्याळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.
अड्याळ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे यांनी शुक्रवारच्या रात्री अड्याळ परिसरातील एका शेतातील दारु अड्ड्यांवर धाड मारली. ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र विक्रेते तेथून पसार झाले. याप्रकरणी मुनेश्वर कुंभलकर व मनोज पचारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत.