महामार्गावरील शंभराहून अधिक ढाब्यांवर दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:29 PM2022-11-20T21:29:50+5:302022-11-20T21:30:58+5:30
परवाना नसलेल्या ढाब्यांमध्ये ही दारू उपलब्ध असते,ही बाब खरंच प्रशासनाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब करणारी आहे. या ढाब्यांमधून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. उल्लेखनीय म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसांमधील काही यंत्रणा मिळून चोरी छुपे पद्धतीने वसुली ही करीत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र याकडे वरिष्ठ पोलिस यंत्रणेचे लक्ष नसावे? ही गोष्ट अजिबात न पचणारी आहे, हे मात्र उल्लेखनीय.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा पोलिस प्रशासनाकडून अवैधपणे दारू विक्रेत्यांवर कारवाई होत आहे परंतु त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या महामार्गावरील शंभरहून अधिक ढाब्यांमध्ये सर्रास दारू विक्री होत आहे. यंत्रणेसह सामाजिक कार्यकर्तेही ढाब्यांकडून वसुलीत व्यस्त असल्याने कारवाई फक्त नावापुरतीच असल्याचेही चित्र आहे. एकीकडे कारवाई तर दुसरीकडे सुट? असे दुटप्पी धोरण जिल्हा यंत्रणा राबवीत आहेत का असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यात पोलिस विभागाचे नवे सेनापती रुजू झाल्यानंतर अवैध धंद्यांना आळा बसवण्याचे धोरण आखण्यात आले. विविध मोहीम राबवून अनेक गुन्ह्यांवर आळाही घालण्यात आला. मात्र प्रत्यक्षात होत असलेली कारवाई व त्यानंतरही सुरू असलेले अवैध धंदे यात शंका कुशंकांना वाव फुटले आहे.
मोहाडी तालुक्यात नुकत्याच गो-तस्करांवर झालेल्या हल्ल्यानंतर गो-तस्कर सुरूच आहे, ही बाब तर स्पष्टच झाली तर दुसरीकडे गौरक्षण करायचे असेल,तर जनावरांना ठेवायचे तरी कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र कामठी व अन्य ठिकाणी कत्तलीसाठी जाणारी जनावरे आजही जात आहेत. रेती वाहतूक असो की गावठी दारू बनविण्याचा अड्डे, सर्वत्र कारवाईचा ससेमिरा करण्यात आला.
मात्र राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ढाब्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. परमिट किवा परवाना नसतानाही या ढाब्यांमध्ये दारू विक्री होत आहे.
परवाना नसलेल्या ढाब्यांमध्ये ही दारू उपलब्ध असते,ही बाब खरंच प्रशासनाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब करणारी आहे. या ढाब्यांमधून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. उल्लेखनीय म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसांमधील काही यंत्रणा मिळून चोरी छुपे पद्धतीने वसुली ही करीत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र याकडे वरिष्ठ पोलिस यंत्रणेचे लक्ष नसावे? ही गोष्ट अजिबात न पचणारी आहे, हे मात्र उल्लेखनीय.
वसुली करतोय तरी कोण?
- गत दोन महिन्यांपासून अवैध धंद्यांवर लगाम लावण्यासाठी विविध धाडसत्र राबविण्यात आले. अवैध धंद्यांवर आळाही बसला. मात्र त्यानंतर हळूहळू पूर्वपदावर अवैध धंदे सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. यातही काही शासकीय यंत्रणेतीलच कर्मचारी सामाजिक कार्यकर्त्यांसह वसुलीसाठी जुंपल्याचे दिसून येते. ही नेमकी वसुली कोण कर्मचारी व कोणता सामाजिक कार्यकर्ता करतोय याचीही शहानिशा होणे अत्यंत गरजेचे आहे. महामार्गावरील भागांमध्ये ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. यामुळे ही बाब उघडकिला आणता येईल.
शंभरपेक्षा जास्त ढाबे
- भंडारा जिल्ह्यातून आधी जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा होता. त्यानंतर त्यात नवीन तीन राष्ट्रीय महामार्गाची भर पडली. जिल्ह्यातील या चारही राष्ट्रीय महामार्गावर शंभरपेक्षा जास्त ढाबे आहेत. याच महामार्गाच्या कडेला असलेल्या ढाब्यांमधून दारूची विक्री होत असल्याचे दिसून येते.