रोहयोच्या कामावर अत्यल्प मजूरी
By admin | Published: May 15, 2017 12:28 AM2017-05-15T00:28:08+5:302017-05-15T00:28:08+5:30
सोमनाळा (बु) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजूरांची...
मजुरांचे आंदोलन : दोन दिवस काम बंद, सोमनाळा येथील प्रकार
कोंढा-कोसरा : सोमनाळा (बु) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजूरांची मजूरी ६ दिवसासाठी ४७२ ते ५०० रुपये चुकारा निघाल्याने मजूरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दोन दिवस स्त्री, पुरुष मजुरांनी काम बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सन्मानजनक मजूरी न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्त्री-पुरुष मजुरांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मजूरांवर काम नाही. त्यामुळे शासनाने सरकारी तलाव, नाला, पांदण रस्ते यांचे कामे काढून मजुरांच्या हाताला काम दिले आहे. सोमनाळा (बु) येथे मामा तलावाचे काम २४ एप्रिल २०१७ पासुन सुरु आहे. यासाठी शासनाने १२ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. रोजगार सेवक म्हणून बिरसराम वंजारी काम पाहत आहेत.
दररोज या कामावर गावातील ३२० ते ३३० स्त्री-पुरुष मजुर काम करीत आहे. रोजगार मजूरांच्या हजेरीवर सध्या घेतल्या तेव्हा कही विशिष्ट गँगचा चुकारा ४७२ ते ५०० रुपये निघाल्याचे लक्षात आले. त्यामुळे मजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा निषेध म्हणूनदोन दिवस काम बंद ठेवून केला.
मजूरांचे म्हणणे आहे की, सर्वांनी सारखे काम केले पण तांत्रिक पॅनलच्या अधिकाऱ्यांनी कामाची मोजणी करतांना भेदभाव करीत ४७२ ते ५०० रुपये सहा दिवसासाठी चुकारा काढला तर इतर चुकारा ९२८ पेक्षा जास्त रुपये काढले आहे. मजूरांना काम करतांना माती खोदकाम करुन जवळपास १५० मीटर तलावाच्या पाळीवर माती वाहून न्यावे लागत आहे. मजूरांनी रोजगार सेवकांनी अनेक बोगास मजूर कामावर दाखविले असल्याचा आरोप केला आहे. मजूरांनी कोऱ्या मस्टरवर सही घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मजूरात असंतोष निर्माण झाला आहे. सदर प्रकरण आमदार अॅड. अवसरे यांनाही कळविण्यात आले.
सरकारी मजूरी २०१ रुपये प्रतिदिवस आहे. त्यासाठी २०३५ घनमीटर काम होणे आवश्यक आहे. माती खोदकामानुसार मजूरांची मजुरी काढली आहे. यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही.
- सतिश माकडे, तांत्रिक पॅनल पं.स. पवनी
सर्व मजूरांना समाधानकारक मजूरी मिळाली पाहिजे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
- रेखा भोवते, सरपंच सोमनाळा (बु.)