शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगा
By admin | Published: March 27, 2016 12:24 AM2016-03-27T00:24:03+5:302016-03-27T00:24:03+5:30
जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका. त्या संकटांचा मुकाबला करा. यश नक्कीच मिळेल अशीच शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे.
एंचिलवार यांचे प्रतिपादन : दिघोरी येथे शिवजयंती उत्सव
दिघोरी (मोठी) : जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका. त्या संकटांचा मुकाबला करा. यश नक्कीच मिळेल अशीच शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे. त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करा. आपल्यावर एखादे संकट आवासून उभे असल्यास शिवाजी महाराजांचे चित्र डोळ्यासमोर आणा. त्यातून आलेल्या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळेल. महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतीत केल्यास जीवनात नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाउपप्रमुख अॅड. वसंत एंचिलवार यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील गुजरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य शिवसैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दुर्गाभैय्या राठोड, डॉ. अजय तुमसरे, लाखनी तालुकाप्रमुख लवकुश निर्वाण, भंडारा तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, अरविंद बनकर, मेघनाथ चौबे, बाबुराव धकाते, राधेश्याम साकोरे, वसंता हटवार, रमेश बारसागडे, राजेश बिरे, बबन चेटूले, बंडू राऊत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी एंचिलवार म्हणाले, शिवरायांनी आपल्या कार्यकाळात कुणाशीही भेदभाव केला नाही. सर्वांना सर्वधर्म समभावाची वागणूक दिली. कुणालाही शुद्र जातीचा म्हणून हिनवले नाही उलट त्याचा सम्मान केला. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यातील बहुतांशी शिवसैनिकांनी दिघोरीच्या शिवसेना मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण दिघोरी मोठी शिवसेना शाखेद्वारे करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे किशोर गोटेफोडे, यशवंत रंगारी, बळीराम हुकरे, योगेश चेटूले, रेवा वलथरे, मारोती गिऱ्हेपुंजे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)