‘राष्ट्रीय पक्षिदिनी’ लाखनीत स्थानिक पक्षिनिरीक्षण व पक्षिगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:33 AM2021-01-13T05:33:11+5:302021-01-13T05:33:11+5:30
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे राष्ट्रीय पक्षी दिन व महाराष्ट्र पक्षिमित्र' संघटनेला चार दशक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाखनी ...
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे राष्ट्रीय पक्षी दिन व महाराष्ट्र पक्षिमित्र' संघटनेला चार दशक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाखनी शहरात स्थानिक पक्षिनिरीक्षण व पक्षिगणना' उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात अखिल भारतीय अंनिस तालुका शाखा लाखनी, नेफडो जिल्हा भंडारा यांचासुद्धा सहभाग होता.
सर्वप्रथम सर्व ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडोचे सदस्य लाखनी बसस्थानकावर एकत्र जमल्यावर पूर्व लाखनी परिसरात बसस्थानक ते मानेगावपर्यंत पक्षिनिरीक्षण करण्यात आले. या पक्षिनिरीक्षणात ३५ प्रकारचे २१० पक्षी आढळले. त्यानंतर पश्चिम लाखनी परिसर पेट्रोलपंप ते सावरी सातबंधारा या भागात २३ प्रकारचे पक्षिप्रजातीचे ११२ पक्षी आढळले. तसेच उत्तर लाखनी परिसरात बाजार चौक ते सावरी तलाव येथे पक्षिनिरीक्षण करून १८ प्रकारचे ९७ पक्षी आढळले. दक्षिण लाखनी परिसर गुजरी चौक ते तलाव परिसरात १६ प्रकारचे ८२ पक्षी आढळले.
पक्षिनिरीक्षण तसेच पक्ष्यांबद्दल,त्यांचे अधिवास,नर- मादी ओळख, इंग्रजी मराठी नावे याबद्दल विस्तृत माहिती ग्रीनफ्रेंड्स,नेफडो, अ.भा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अशोक गायधने यांनी उपस्थित नेचर क्लबच्या सदस्यांना पक्षिनिरीक्षणवेळी दिली. पक्षी-प्राण्यांविषयी असणाऱ्या विविध अंधश्रद्धा गैरसमजावर प्रकाश टाकला.
दुर्मीळ पक्षी सारस, गिधाड प्रजातीच्या संवर्धनासाठी जागृती करण्याविषयी आव्हान केले. पक्षिनिरीक्षण केल्यानंतर सर्वजण बसस्टॉपवर एकत्र आल्यावर 'राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्ताने व महाराष्ट्र पक्षी संघटनेला चार दशक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. सलीम अली व पक्ष्याच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय प्रताप सिंह व डॉ. मनोज आगलावे यांनी केले. पक्षिनिरीक्षण व गणनेचा अहवाल छविल रामटेके, वेदांत पंचबुद्धे यांनी टाळ्यांच्या गजरात सादर केला. डॉ. मनोज आगलावे यांनी पक्षिनिरीक्षणविषयी अनेक बाबी सहभागींना विचारून त्यांचा उत्साह वाढविला. अजय सिंह यांनी बांधकाम व पर्यावरण संतुलन आणि पक्षिनिरीक्षण याविषयी माहिती देऊन उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख अतिथींना तसेच सर्पमित्र ,पक्षिमित्रांना ग्रीनफ्रेंड्सतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य, योगेश वंजारी, गजानन गभने, दिनकर कालेजवार, पंकज भिवगडे, नामदेव कान्हेकर, दिलीप भैसारे यांनी पक्षिनिरक्षणात सहभाग नोंदविला. यानिमित्ताने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. संचालन अशोक वैद्य, प्रास्ताविक प्रा. अशोक गायधने यांनी केले. आभार दिलीप भैसारे यांनी मानले. स्थानिक पक्षिगणनेला, छविल रामटेके, आशिष खेडकर,आदित्य शहारे,संकल्प वैद्य,रोशन बागडे, अयान रामटेके,वेदांत पंचबुद्धे,ओंकार चाचेरे, पंकज देशमुख, अमर रामटेके, दीप रामटेके,साहिल निर्वाण, प्रगती तरोणे, गौरेश निर्वाण, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, राहुल नान्हे, अर्णव गायधने यांनी पक्षिनिरीक्षण व गणनेत सहभाग नोंदविला.