लोकल ब्रँडची विक्री ब्रँडेडच्या किमतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:35 PM2018-09-02T21:35:42+5:302018-09-02T21:36:05+5:30

बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते.

Local brands sell branded prices | लोकल ब्रँडची विक्री ब्रँडेडच्या किमतीत

लोकल ब्रँडची विक्री ब्रँडेडच्या किमतीत

Next
ठळक मुद्दे‘एमआरपी’चे गौडबंगाल : सर्वाधिक लूट मिनरल वॉटरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते. गुणवत्ता आणि सर्व निकष डावलून स्थानिक कंपन्या ब्रँडेडच्या नावावर चांगभल करून घेत आहे. मिनरल वॉटरसह विविध कोलड्रिंक्स विकताना कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल केले जातात. भंडारा शहरात हा प्रकार राजरोस सुरू असून याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ग्रामीण वळणाच्या भंडारा शहरात मल्टीप्लेक्स संस्कृती अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे एमआरपीपेक्षा अधिक किमतीत खाद्यपदार्थांची विक्री सहसा होत नाही. पॅकिंगवर असलेली किमतच ग्राहकांकडून घेतली जाते. मात्र मिनरल वॉटर आणि कोलड्रिंक्समध्ये ग्राहकांची लुट सुरू आहे. शहरात मिनरल वॉटरच्या बँ्रडेड कंपन्यासह लोकल कंपन्याची सरमिसळ करून विक्री केली जाते. मिनरल वॉटरच्या पाच-सहा कंपन्यांचे बाटलीबंद पाणी शहरात विकले जाते. ग्रामीणच नव्हे तर शहरी ग्राहकांच्याही लेखी मिनरल वॉटर म्हणजे ‘बिसलेरी’ असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे बाटलीबंद पाणी बिसलेरीचे पाणी म्हणूनच विकले जाते. याचाच फायदा हुशार दुकानदार घेत आहेत. अधिक नफा कमाविण्याच्या नादात स्थानिक कंपन्यांचे पाणी ग्राहकांच्या माथी मारले जाते. एकाद्या चोखंदळ ग्राहकाने विशिष्ट कंपनीचा आग्रह धरला तर दुकानदार त्याला थेट नाही असे म्हणतात. यामागचे गौडबंगाल म्हणजे बॅ्रंडेड कंपन्याच्या मिनरल वॉटरवर प्रॉफिट आॅफ मार्जिन अतिशय कमी असते. उलट स्थानिक कंपन्या आपले उत्पादन कमी किमतीत दुकानदारांना देतात. मात्र दुकानदार ग्राहकाला तिच बॉटल ब्रँडेडच्या किमतीत विकतात. यातून अधिक नफा कमाविला जातो. मात्र स्थानिक कंपन्यांची गुणवत्ता अतिशय सुमार असते. आरोग्याची कोणतीही काळजी घेतली गेली नसते. मात्र ग्राहक जागृत नसल्याने तक्रार केली जात नाही. त्यातही बाटलीबंद पाणी विकत घेणारे ग्राहक साधारणत: बाहेर गावचे असतात. तहान भागवायची आहेना असे म्हणत दुकानदाराने माथी मारलेले पाणी प्राशन करतात आणि निमुटपणे निघून जातात.
भंडारा शहरात सॉफ्टड्रिंक्स मात्र एमआरपीपेक्षा अधिक किमतीत विकले जात असल्याचे दिसून आले. आंब्यापासून बनविलेल्या आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले सॉफ्टड्रिंक्स पंधरा रुपयांची बॉटल २० रुपयापर्यंत विकली जाते. बालहट्टापुढे पालकांचे काही चालत नसल्याने दुकानदार म्हणेल तिच किमत द्यावी लागते. एकाद्या चोखंदळ ग्राहकाने याबाबत विचारले तर त्याला कुलिंग चार्जेस असे गोंडस नाव दिले जाते.
हॉटेल आणि धाब्यांमध्ये अधिक प्रमाण
भंडारा शहरासह जिल्ह्यातील हॉटेल आणि ढाब्यांवर अनेक खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा अधिक किमतीत विकले जात असल्याचे दिसून आले. मात्र बाहेरचे ग्राहक असल्याने कुणीही कुरकुर करताना दिसले नाही. बिलात लावलेली किंमत मोजून ग्राहक आपल्या मार्गाने रवाना होत होते. नेहमीच्या ग्राहकांना मात्र या ठिकाणी योग्य किंमत लावली जात होती. हॉटेलचालकांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे एकदाचेच ग्राहक असतात, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक पैसे घेतल्याने तो पुन्हा यावा अशी अपेक्षाही नसते. याच मानसिकतेमुळे हॉटेल धाब्यावर एमआरपी पेक्षा अधिक किमतीत खाद्यपदार्थ व मिनरल वॉटर विकले जाते.

Web Title: Local brands sell branded prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.