लॉकडाऊनने हिरावले चिमुकल्यांचे मैदानी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:05+5:302021-05-22T04:33:05+5:30
लाखांदूर : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी अतिप्रमाणात गेली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले मैदानी खेळ विसरत चालली आहेत. ...
लाखांदूर : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी अतिप्रमाणात गेली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले मैदानी खेळ विसरत चालली आहेत. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व मानसिक विकार जडत आहेत. त्यामुळे ‘मोबाईल टाळा, मैदानी खेळ खेळा ’ अशी आज्ञाही आता कोरोनामुळे चिमुकल्यांना पालकांना देता येत नाही. संचारबंदी असल्याने लहान बालकांना घराबाहेर पडणे कठीण झाल्याने लॉकडाऊनने चिमुकल्यांचे मैदानी खेळ हिरावले असल्याचे चित्र पहावयास मिळत असून ज्येष्ठ नागरिकात त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मैदानी खेळ म्हणजे जे खेळ मैदानावर खेळले जातात. या खेळाने संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्यानेच शरीर स्वस्थ राहते. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, उंच उडी, लगंडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश आहे.
कोविड चाचणी दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन करीत संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापने , शाळा , महाविद्यालये बंद पाडण्यात आल्याने सगळीकडे लहान बालके घरातच दिसून येत आहेत.
दरवर्षी उन्हाळा आला की सर्वांना सुट्या लागायच्या. लहान बालके या सुट्यांचा मनसोक्त आनंद घेत असत. कुठलाही शालेय अभ्यास या कालावधीत नसल्याने त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असे. या खेळण्यामध्ये ते मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळताना देखील दिसायचे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडणे , दगडाने आंबे पाडणे यांसह अन्य खेळ खेळताना दिसत होते. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊन लागल्याने बालकांना कोरोनाचा संसर्गामुळे घरातील मंडळीच बाहेर पडू देत नसल्याने त्यांचे मैदानी खेळ सध्यातरी हिरावल्याचे वास्तव आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत समर कॅम्पचे आयोजन केले जात होते. या समर कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर मुले सहभागी होतात. यंदाही विविध क्रीडा प्रशिक्षकांनी समर कॅम्पचे नियोजन केले होते. मात्र, कोरोना विषाणूने घात केला आहे. मार्च महिन्यांपासून टाळेबंदी जाहीर झाली आणि समर कॅम्पच्या नियोजनावर पाणी फेरले गेले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मैदानेच बंद पडल्याने लॉकडाऊनने चिमुकल्यांचे मैदानी खेळच हिरावल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.