मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By admin | Published: January 14, 2017 12:29 AM2017-01-14T00:29:25+5:302017-01-14T00:29:25+5:30

स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या ...

Locked lock to school for transfer of headmaster | मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेला ठोकले कुलूप

मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेला ठोकले कुलूप

Next

पिंडकेपार येथील घटना : गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
भंडारा : स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या वादाच्या पर्यावसातून शाळेला कुलूप ठोकण्यात आले. ही घटना भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त झालेल्या शाळा समितीच्या अध्यक्षासह काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्रावण हजारे यांची बदली करण्याची मागणी केली आहे.
पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ या वर्गात एकुण ३२ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत जिर्ण झाली असल्याने विद्यार्थी झाडाखाली किंवा बांधण्यात आलेल्या एका खोलीत विद्यार्जन करतात. मुख्याध्यापक श्रावण हजारे हे शाळेत येतात, मात्र विद्यार्थ्यांना शिकवित नाहीत असा आरोपही त्यांच्यावर यावेळी लावण्यात आला. दरम्यान २२ जानेवारीला शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त निमंत्रण पत्रिका छपाईचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेत कुणाची नावे घालायची या विषयावर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव कावळे व मुख्याध्यापक श्रावण हजारे यांच्यामध्ये वाद झाला. वादात मुख्याध्यापक हजारे यांनी कावळे यांना माझी बदली करुन दाखवा, असे झाल्यास सप्रेम भेट म्हणून मी तुम्हाला ५० हजार रुपये देईन असे बोलले. याच कारणावरुन आज सकाळी संतप्त झालेल्या कावळे यांच्यासह अन्य गावकरी शाळेत आले. तसेच अध्यक्षांसोबत असभ्य बोलणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करुन त्यांची बदली करावी या कारणासाठी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य वर्षा साकुरे, सरपंच प्रशांत रामटेके, पोलीस पाटील साठवणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बबलु आतिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मुख्याध्यापकांना पाठिंबा
क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापकांना नाहकच गोवले जात आहे. त्यांची मागील चार वर्षांची कामगिरी चांगली आहे. त्यांनी या शाळेत विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी कामे केली आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप योग्य नाही. चर्चा करुन विषय सोडविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया येथील उपस्थित काही महिलांनी व्यक्त केली. मात्र या वादात शाळा बंद करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये याची काळजी घेतली जावी असेही मत व्यक्त केले. यावरुन या महिलांचा मुख्याध्यापकांना पाठींबा असल्याचे जाणवले.

मागील चार वर्षांपासून शाळेत विविध उपक्रमांसह शालेय वास्तु बांधकामासाठी पाठपुरावा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे असा हेतु माझा कधीही राहिलेला नाही. स्वखर्चाने मी काही कामे केली आहेत. याची कबुली स्वत: पालकांसह विद्यार्थीही देतात. माझ्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी जाहिरपणे माफी मागतो.
- श्रावण हजारे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, पिंडकेपार
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसोबत असभ्य भाषा वापरणे अत्यंत चुकीची बाब आहे. असे वर्तण कदापी खपवून घेण्यात येणार नाही. मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी, हीच मुख्य मागणी आहे.
- बबलू आतिलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पिंडकेपार

Web Title: Locked lock to school for transfer of headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.