आंतरराज्यीय सीमेवरील पोलीस चौकी दुसऱ्या दिवशीच कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:45 PM2018-09-18T21:45:53+5:302018-09-18T21:46:12+5:30
आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी तुमसर तालुक्यातील बपेरा सीमेवर करण्यात आलेले पोलीस चौकीचे उद्घाटन औटघटकेचे ठरले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौकी कुलूपबंद करण्यात आले. पोलिसांच्या रिक्त पदाचा फटका या चौकीला बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी तुमसर तालुक्यातील बपेरा सीमेवर करण्यात आलेले पोलीस चौकीचे उद्घाटन औटघटकेचे ठरले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौकी कुलूपबंद करण्यात आले. पोलिसांच्या रिक्त पदाचा फटका या चौकीला बसला आहे.
सिहोरा परिसरात असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सीमेवर गणेशचतुर्थीच्या पूर्व संध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी खासगी घरात असणारी ही चौकी कुलूपबंद करण्याचे संकट पोलिसांवर ओढावले. सिहोरा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आकडा फुगत आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. परिणामी सध्या २५ पदे रिक्त आहेत. यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावी होत आहे. तपास करताना पोलिसांची दमछाक होत आहे.
अशातच आता बपेरा सीमेवर २४ तास नियुक्ती करणे कठीण जात आहे. त्यामुळे या पोलीस चौकीला कुलूपबंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट व उद्घाटनानंतरही रिक्त पदाची समस्या सुटली नाही. ही चौकी निरंतर सुरु ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी रिक्त पदे भरावी अशी मागणी आहे.
पोलिसांची पदे रिक्त असली तरी पोलीस चौकीचे कामकाज २४ तास सुरु ठेवण्याचे प्रयत्न आहे. या कार्यात गृहरक्षकदलाचे सहकार्य घेतले जात आहे.
-प्रमोद बनबले, पोलीस निरीक्षक, सिहोरा.