Lok Sabha Election 2019; लाखनी तालुक्यात १०१६ दिव्यांग मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:01 PM2019-03-27T22:01:38+5:302019-03-27T22:02:04+5:30
भारतीय निवडणूक अयोगद्वारा लोकसभेच्या निवडणुका भंडारा-गोंदिया क्षेत्रात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणूक आयोगद्वारे सुलभ निवडणुका अंतर्गत अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांचा केंद्रानुसार आढावा घेऊन अपंग मतदारांना कोणाच्याही मदतीशिवाय मतदान करणे शक्य होणार आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : भारतीय निवडणूक अयोगद्वारा लोकसभेच्या निवडणुका भंडारा-गोंदिया क्षेत्रात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणूक आयोगद्वारे सुलभ निवडणुका अंतर्गत अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांचा केंद्रानुसार आढावा घेऊन अपंग मतदारांना कोणाच्याही मदतीशिवाय मतदान करणे शक्य होणार आहे.
साकोली विधानसभा मतदार संघातील लाखनी तालुक्यात १३४ मतदान केंद्रापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येत आहे. तालुक्यात १०१६ दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी अंध १२३, अपंग ७५६, कर्णबधीर ७८, मुकबधीर ३१ व इतर प्रकारचे ५७ दिव्यांग मतदार आहेत. तालुक्यातील ९८ मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्हिलचेअरची गरज आहे. त्यासाठी ६८ व्हिलचेअरची गरज आहे.
तालुक्यातील लाखोरी, सामेवाडा, सावरी, आलेसूर, मासलमेटा, राजेगाव, केसलवाडा पवार, परसोडी, लाखनी, केसलवाडा वाघ, मानेगाव सडक, पिंपळगाव सडक, सिपेवाडा, रेंगेपार, कोहळी, पोहरा, धाबेटेकडी, शिवणी, पेंढरी, मिरेगाव, सोमनाळा, दिघोरी, इसापूर, मुरमाडी तुपकर, डोंगरगाव, मेंढा, टोली, गुरढा, निमगा, भुगाव, जेवनाळा, कवडसी, कोलारी, किटाडी, कवलेवाडा, विहीरगाव, देवरी गोंदी या ठिकणच्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची संख्या जास्त आहे.
दिव्यांग मतदारांना हॅन्डरेल असलेले रॅम्प उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंध मतदारांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर अपंग मतदारासाठी व्हिल चेअरची सोय करून दिली जाणार आहे. तहसिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतला व्हिलचेअर खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यानुसार ६८ व्हिलचेअरची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारावर भर दिलेला आहे. लोकशाहीत प्रत्येकांना मतदान करण्याचा हक्क आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता दिव्यांगांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशिल आहे. प्रत्येक गावातून दिव्यांगाची माहिती गोळा करणे सुरू आहे.
सुलभ निवडणुकाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक गावात जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतला व्हिलचेअर खरेदी करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
-मल्लिक विराणी, तहसीलदार लाखनी.