Lok Sabha Election 2019; भंडारा-गोंदिया मतदारसंघात ४९.२० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:50 PM2019-04-11T19:50:59+5:302019-04-11T19:52:59+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून २१८४ मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळीपासून रांगा लागल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजेपर्यंत ८.४५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २१.८८ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३८.१९ टक्के आणि दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले होते.
राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशीवार, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रावर सर्व कारभार महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडे होता. मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथील मतदान केंद्र तर लग्न सोहळ्यासारखे सजविण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून प्रवेशद्वारावर बलून बांधण्यात आले होते. बोहल्यावर चढण्यापुर्वी पाच नवरदेवानी जिल्ह्यातील चार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वृध्दही मतदानासाठी उत्साहाने आल्याचे दिसत होते. साकोली तालुक्यातील परसोडीच्या रत्नूबाई पातोडे या वृध्द महिलेला चक्क उचलून मतदान केंद्रावर आणण्यात आले. अनेक ठिकाणी दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शांतनू गोयल संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात कुठेही निवडणुकीदरम्यान अनूचित प्रकार घडला नाही.
निकालाची ४२ दिवस प्रतीक्षा
लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी तब्बल ४२ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ११ एप्रिल रोजी मतदान आटोपले असून आता निकाल २३ मे रोजी घोषीत होणार आहे. तब्बल ४२ दिवस उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे. या काळात मतदानाच्या टक्केवारीवरुन जयपराजयाचे गणित आखले जातील. कोण-कुठे चालला यावर तब्बल दीड महिना चर्चा होणार आहे.