Lok Sabha Election 2019; ४२ अंश तापमानात ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 09:58 PM2019-04-11T21:58:08+5:302019-04-11T21:59:56+5:30

सूर्य आग ओकत असताना तब्बल ४२ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले.

Lok Sabha Election 2019; 70 percent voting in 42 degrees | Lok Sabha Election 2019; ४२ अंश तापमानात ७० टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; ४२ अंश तापमानात ७० टक्के मतदान

Next
ठळक मुद्देलोकशाहीचा उत्सव : १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद, ४२ दिवस करावी लागणार निकालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सूर्य आग ओकत असताना तब्बल ४२ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले. दुपारी तापमानाची पर्वा नकरता अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र लग्न सोहळ्यासारखे सजविण्यात आले होते.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. २१८४ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. नागरिकांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. भंडाराचे तापमान गुरुवारी ४२ अंश सेल्सीअस एवढे नोंदविल्या गेले. सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसत होते. परंतु लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारानी उन्हाची पर्वा न करता मतदान केंद्र गाठले. सकाळी मतदानाला प्रारंभ झाला तेव्हा मतदानाची गती कमी होती. मात्र ९ वाजतानंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. दुपारी ३ वाजतापर्यंत ४९.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात कुठेही तांत्रिक बिघाडाने मतदान खोळंबले नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आला. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळी संथगतीने सुरु झालेल्या मतदानाने दुपारी घेतला वेग
नेत्यांनी केले मतदान
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व पत्नी वर्षा पटेल यांनी आपल्या कन्यांसह गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या मतदान केेंद्रावर मतदान केले. खासदार मधुकर कुकडे यांनी तुमसर येथे मतदान केंद्रावर सहपरिवार जावून मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा शहरात, साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी सेंदुरवाफा येथे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी कांद्री येथे, रामचंद्र अवसरे यांनी पवनी येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांनी भंडारा शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी नुतन महाराष्ट्र विद्यालयात सपत्नीक मतदान केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी साकोली तालुक्यातील कुंभली येथे मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक विभागाने सजविले
सखी व आदर्श मतदान केंद्र

यावर्षी भंडारा -गोंदिया मतदार संघात सखी आणि आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली होती. सखी मतदान केंद्रावर सर्व कारभार महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडे होता. मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथील मतदान केंद्र तर लग्न सोहळ्यासारखे सजविण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून प्रवेशद्वारावर बलून बांधण्यात आले होते. खापा येथील सखी केंद्रावरही असेच दृष्य होते.
वयोवृद्धांचे मतदान
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर वृध्दही मतदानासाठी उत्साहाने आल्याचे दिसत होते. साकोली तालुक्यातील परसोडी येथे रत्नबाई पातोड या वृध्द महिलेला चक्क उचलून मतदान केंद्रावर आणण्यात आले.
अड्याळ येथे ५९.५९ टक्के मतदान
तालुका निर्मितीसाठी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारणाºया पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ५९.५९ टक्के मतदान झाले. तालुका निर्मितीसाठी गत काही दिवसांपासून अड्याळ येथे आंदोलन सुरु आहे. सुरुवातीला गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी या निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला. अड्याळ येथील दहा मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९.५९ टक्के मतदानाची नोंद झाली.
३१८ मतदान केंद्रांवर वेब कास्टींग
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील ३१८ मतदान केंद्रावरून गुरुवारी वेब कास्टींग करण्यात आले. त्यात भंडारा जिल्ह्यातील २२१ आणि गोंदिया जिल्ह्यातील ९७ मतदान केंद्रांचा समावेश होता. वेबद्वारे झालेले थेट प्रसारण केवळ जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बघता येणार होते.
साकोलीत सर्वाधिक मतदान
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान साकोली येथे ६६.७१ टक्के झाले होते. तुमसरमध्ये ६४.३४ टक्के, भंडारा ६१.५८, अर्जुनी मोर. ४७.९८ टक्के, तिरोडा ६१.७९ टक्के आणि गोंदिया ६०.४० टक्के मतदानाची नोंद झाली.
बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान
बोहल्यावर चढण्यापूर्वी पाच नवरदेवांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मुडावळ्या आणि फेटा बांधलेले नवरदेव लग्नमंडपापुर्वी मतदान केंद्रावर पोहचले. तुमसर तालुक्यातील वाहनी मतदान केंद्रावर आशिष ढबाले हा नवरदेव मतदान केंद्रावर आला. लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील पितांबर जेंगठे आणि मडेघाट येथील पंकज तुपटे या नवदेवानेही मतदानाचा हक्क बजावला. साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथील दिलीप चांदेवार या नवरदेवाने विवाहापूर्वी मतदानाचा हक्क बजावला तर बेटाळा येथे दोन नवरदेव एकाच वेळी मतदान केंद्रावर आले. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून नंतर लग्नासाठी रवाना झाले.

Web Title: Lok Sabha Election 2019; 70 percent voting in 42 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.