Lok Sabha Election 2019; पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:43 PM2019-04-08T22:43:16+5:302019-04-08T22:44:13+5:30
एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत विस्मृतीत गेलेल्या पोस्टकार्डचा मतदान जनजागृतीसाठी मोठ्या कल्पक्तेने उपयोग केला. पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या, अशी कुजबुज गावागावात ऐकायला येत आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत विस्मृतीत गेलेल्या पोस्टकार्डचा मतदान जनजागृतीसाठी मोठ्या कल्पक्तेने उपयोग केला. पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या, अशी कुजबुज गावागावात ऐकायला येत आहे.
आधुनिक प्रसार माध्यमाच्या काळात पोस्टकार्ड लुप्त झालं. कित्येकांच्या घरी तर दोन-तीन दशक झाली पत्रच आले नाही. मात्र या गत स्मृतींना उजाळा देण्याचे काम यंदा जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.
बीएलओच्या माध्यमातून पोस्टकार्ड आणि फोटो व्होटर स्लिप तीन लाख ७५ हजार कुटुंबापर्यंत पोहचवली जात आहे. या पत्रात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलेच आहे. सोबत ओळखपत्र म्हणून कोणती ११ दस्तावेज लागतात. याची माहिती देण्यात आली आहे.
पोस्टकार्ड मतदान जागृतीचे प्रभावी माध्यम
भंडारा जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी सुरू केलेला पोस्ट कार्डचा उपक्रम कौतुकास्पद आहे. पोस्टकार्ड ही संकल्पना मतदार जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरेल. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा हा कल्पक उपक्रम असून पोस्टकार्डसारखे पारंपारीक संदेश माध्यम वापरून मतदारांना प्रोत्साहित करण्याची ही कल्पना भन्नाट आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल.
-डॉ. पार्थ सारथी मिश्रा, मुख्य निवडणूक निरीक्षक, भंडारा
असा आहे पोस्टकार्डमध्ये मतदारांना संदेश
प्रिय मतदार,
आपणास कळविताना आनंद होत आहे की, आपण भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी निवडूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मतदान म्हणून नाव नोंदविले. त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन!
आपणास माहितीच आहे की, देशामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. आपण निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही भक्कम करण्याच्या कार्यात सहभागी व्हा, लोकशाहीचे आधारस्तंभ बना व राष्ट्र उभारणीच्या उत्तात कार्याचे साक्षीदार व्हा.
-शांतनू गोयल, जिल्हाधिकारी, भंडारा.
बीएलओ पोहचविणार घरपोच पोस्ट कार्ड
मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदार जनजागृतीचे पोस्टकार्ड घरोघरी पोहचविले जाणार आहे. या पोस्टकार्डचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, विलास ठाकरे, अभिमन्यू बोदवळ, डीएसओ रमेश बेंडे, उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर व स्विपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले उपस्थित होते.
वंचित न राहो कुणीही मतदार
1. लोकसभा निवडणुकीत कुणीही मतदार वंचित राहणार नाही यासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे.
2. पोस्टर, होर्डिंग, कलापथक, सोशल मिडियाच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.
3. भंडारा निवडणूक विभाग असा अभिनव उपक्रम राबविणारा एकमेव जिल्हा असावा.
4. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून सर्व शासकीय यंत्रणा यासाठी कामाला लागली.