Lok Sabha Election 2019; मोदी सरकारला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:04 AM2019-04-08T01:04:34+5:302019-04-08T01:04:53+5:30
‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकविण्याची संधी आली आहे. नऊ महिन्यापुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेने भाजपचा पराभव करुन देशात परिवर्तनाची सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकविण्याची संधी आली आहे. नऊ महिन्यापुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेने भाजपचा पराभव करुन देशात परिवर्तनाची सुरुवात केली. आता पुन्हा सार्वत्रिक निवडणूकीत मतदारांनी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहून प्रफुल्ल पटेल यांची ताकद वाढवावी, असे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.
भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, रामलाल चौधरी, धनंजय दलाल, माजी आमदार आनंदराव वंजारी, आमदार प्रकाश गजभिये, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल, नरेंद्र झंझाड, मनीष गणवीर, यशवंत सोनकुसरे, राजकुमार राऊत, शिशीर वंजारी, जया सोनकुसरे, प्रेम वनवे, प्यारेलाल वाघमारे, सीमा भुरे, सुनिता भुरे, गोपाल कारेमोरे आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, देश बदल रहा है, पंरतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. उलट खोटी आश्वासने व फसव्या घोषणा करुन महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बरोजगारी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.
नऊ महिन्याआधी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी भाजप उमेदवाराचा पराभव करुन राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे निवडून आले. यातून देशातील जनतेला परिवर्तन हवे असल्याचे दिसून आले, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नोटबंदी, स्कील इंडिया, मेकिंग इंडिया आदींवर घनाघाती टिका केली.
प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी संपुर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. गोसे प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. मात्र फडणवीस आणि मोदी सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून टाकला त्याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.