शीतलची मृत्यूशी एकाकी झुंज निरर्थक ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:55+5:302021-07-30T04:36:55+5:30
आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी शिवशंकर केवट छत्तीसगड येथे कामावर होता; तर पत्नी पूनम आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी आयुध निर्माणी ...
आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी शिवशंकर केवट छत्तीसगड येथे कामावर होता; तर पत्नी पूनम आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी आयुध निर्माणी खानावळीत कंत्राटदाराकडे कामावर होती. मोठा मुलगा बारावीचे शिक्षण पूर्ण करून, आपल्या वडिलांना हातभार लावण्यास गेला. पूनम दोन मुलांचे शिक्षण कसेबसे करीत होत्या. त्यांची मुलगी शीतल ही कोढी येथील ग्रामविकास विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. मात्र काळाने शीतलला एका असाध्य रोगाने पछाडले. तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला कर्करोग असल्याचे निदान झाले. या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून इंदिरानगरातील विवेकशील युवा मंचतर्फे वर्गणी गोळा करण्यात आली. या किशोर कळंबे, मनीष मेश्राम, रजत बावणे, करण मेश्राम, जीवेश मेश्राम, साहिल परतेके, भूषण रामटेके, रोहन शामकुँवर, टिकेश्वर शाहू, शुभम पाटील, प्रीतम सांगोडे, शिवम केवट, कुणाल मेश्राम, करण मेश्राम, संमेक रामटेके यांचा समावेश आहे. गोळा केलेली आर्थिक मदत बुधवारी सायंकाळी केवट यांच्या घरी पोहोचवण्यात आली. शीतलने रोगाशी एकाएकी झुंज देत एक आठवडा काढला. मात्र गुरुवारी सकाळी शीतलने या जगाचा निरोप घेतला.