लोंबकळता प्रवास
By admin | Published: February 5, 2015 11:02 PM2015-02-05T23:02:17+5:302015-02-05T23:02:17+5:30
रेल्वे प्रशासन प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचा दावा करीत असले तरी तुमसर - तिरोडी प्रवाशी रेल्वेगाडीत शेकडो प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.
डेमो रेल्वे हाऊसफुल्ल : गोबरवाही रेल्वेस्थानकावर थांबली दोन तास गाडी, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहन भोयर - तुमसर
रेल्वे प्रशासन प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचा दावा करीत असले तरी तुमसर - तिरोडी प्रवाशी रेल्वेगाडीत शेकडो प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून प्रवाशी रेल्वे हाऊसफुल्ल झाल्याने शेकडो प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास केला.
तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशातील तिरोडी रेल्वे स्थानकादरम्यान दिवसातून चारवेळा प्रवाशी रेल्वेगाडी धावते. सकाळी ६ वाजता व १०.३० ची डेमो प्रवासी रेल्वेत दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गाडीला चार ते पाच डब्बे राहतात. गोंदिया - नागपूर, रायपूरकडून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी येथे उतरतात. पुढे तिरोडीकडे ते जातात.
मध्यप्रदेशाकडे जाणारा हा एकमेव रेल्वे मार्ग आहे. रेल्वेचे तिकीट दर कमी आणि सुरक्षित प्रवासाकरिता प्रवाशी या रेल्वेने जातात. या मार्गावर मॅग्नीज खाणी असून मजुरांची संख्या अधिक आहे. उत्तर भारतात जाण्याकरिता हा मार्ग कमी अंतराचा आहे. तिरोडी - कटंगी व बालाघाटला याच मार्गाने जाता येते. या प्रवाशी रेल्वेत प्रवेश करण्यासाठी जागा नसते.
गुरुवारी महिला व वृद्ध प्रवाशांनी खासगी तथा बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. शेकडो प्रवाशांनी दारावर उभे राहून लोंबकळत जीव धोक्यात घालून प्रवास केला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तथा कर्मचारी हे केवळ पाहतात. या रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या कमी असल्याने गाडीत तिकीट तपासणीस राहत नाही. तिकीट विक्री केंद्र या मार्गावरील अनेक स्थानकावर रेल्वे प्रशासनाने बंद केली आहेत. तुमसर रोड रेल्वे स्थानक ‘ड’ दर्जाचे असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दोन महिन्यापूर्वी तुमसर रोड येथे सांगितले होते.
तिकीट विक्री कमी होत असल्याने सुविधा पुरविल्यास रेल्वे प्रशासन असमर्थ आहे अशी प्रतिक्रिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली होती.