पारडीतील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:03+5:30
शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पारडी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले. त्यामुळे परिसरातील मुर्झा, झरी, पारडी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीसाठी आणायला सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शासनाने शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे उन्हाळी धानासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या धान खरेदीलाच अधिक प्राधान्य देत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्यांनाच अरेरावी केली जात आहे. त्यामुळे पारडी परिसरातील शेतकरी गत अनेक दिवसांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणाविरोधात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पारडी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले. त्यामुळे परिसरातील मुर्झा, झरी, पारडी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीसाठी आणायला सुरुवात केली. तालुक्यातील खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत आधारभूत केंद्रावर एका ग्रेडरची येथे नेमणूक करण्यात आली आहे. मात्र ग्रेडर धान खरेदीसाठी शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच प्राधान्य देत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.
खरेदी केंद्रावर सातबाऱ्याविनाच सूर्यादयापासून धानाचे मोजमाप सुरु राहत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. येथे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याऐवजी साध्या वजनकाट्याने शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप केले जात असून शेतकऱ्यांची लूट होत आहे.
शासनाकडून हमाली दिली जात असताना ग्रेडर व हमाल शेतकऱ्यांकडून अतिरिक्त हमाली वसूल करीत आहेत. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना हेकेखोरपणे दमदाटी व अरेरावी करत होत असून या संबंधी तातडीने चौकशी करून केंद्रावरील ग्रेडरला तात्काळ हटविण्यात यावे यासंबंधीचे निवेदन बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रोफेसर किरपान, नेपाल ठवकर, किशोर कन्नाके, भोजू ठलाल, शंकर मेंढे, ईश्वर मेश्राम, शालीकराम टेंभुर्णे, कांताबाई मेश्राम, धनपाल ठलाल, भोजराज लाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ग्रेडरच्या विरोधात केलेली तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त होताच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
-रामचंद्र परशुरामकर,
सभापती खरेदी विक्री संस्था लाखांदूर.