शेतकऱ्यांची लूट, नव्या दरानेच खतविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:13+5:302021-05-24T04:34:13+5:30
खरिपाच्या तोंडावर खताचे भाव वाढल्याने विविध राजकीय पक्षांनी या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. खत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट ...
खरिपाच्या तोंडावर खताचे भाव वाढल्याने विविध राजकीय पक्षांनी या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. खत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना डीएपी खत प्रतिपिशवीच्या खरेदीवर मिळणारे पाचशे रुपयांचे अनुदान वाढवून ते १२०० रुपये करण्यात आले आहे. जुन्याच किमतीत शेतकऱ्यांना खते मिळावी यासाठी खतांचे अनुदान केंद्र सरकारने वाढविले आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक कृषी केंद्रांमध्ये नवीन दरानेच खत विक्री सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. खतांचे दर हे वेगवेगळे आहेत. डीएपीची एक बॅग साधारणत: दीड हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाखांदूर तालुक्यात मात्र अनेक कृषी केंद्रधारक हे आमच्याकडे जुना साठा शिल्लक नसल्याचे कारण सांगतात. खरीप हंगामात जिल्ह्यात लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर एवढे आहे. कृषी विभागातर्फे खरिपाची जोमात तयारी सुरू आहे. खताचे साठे होऊ नयेत, तसेच शेतकऱ्यांची लूट टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकरी मशागतीची कामे करून बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र, अजून खताच्या किमती कमी होतील आणि आपल्याला कमी दराने खत मिळेल ही शेतकऱ्यांची आशा मात्र फोल ठरताना दिसून येत आहे.
बॉक्स
जादा किमतीने होतेय खतांची विक्री
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक कृषी विक्रेत्यांकडून मूळ किंमत कमी असतानाही १०.२६.२६ या खतासाठी बाराशे पन्नास रुपये, तसेच डीएपी खतासाठी चौदाशे ते पंधराशे रुपये आकारण्यात येत आहेत. यासोबतच अनेक कृषी विक्रेते हे शेतकऱ्यांना दिशाभूल करून समोर भाव वाढतील असेही सांगत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने अशा कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून परवाने निलंबित करण्याची गरज आहे. अनेकजण खताचा साठा संपला आहे असे सांगतात, तर वाढीव दराने खत खरेदी करतो सांगितल्यास तत्काळ उपलब्ध करून देतात.
बॉक्स
शेणखताच्या मागणीत वाढ
रासायनिक खतांचे वाढलेले भाव वाढले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेणखताला पहिली पसंती दिली असून, शेतकऱ्यांनी शेण खत वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, गांडूळ खते, जैविक खते वापरण्यावर भर दिला जात आहे. शेणखतापासून तयार झालेले खत जमिनीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर ठरत असून, जमिनीचा पोत सुधारण्यास महत्त्वाचा ठरत आहे.
कोट -
केंद्र सरकारने खरिपाच्या तोंडावर भाववाढ केली होती. मात्र, आता खतांच्या अनुदानात वाढ केली असून, शेतकऱ्यांना जुन्या किमतींतच खत देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कृषी विक्रेते मात्र जादाचे दर आकारत आहेत.
शेतकरी
सरकारने खतांचे अनुदान वाढविले असले तरी भविष्यात दरवाढ होते की काय याची चिंता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. खत द्यायचे झाल्यास त्यासोबत इतर वस्तू घ्या हा प्रकारही अनेक कृषी केंद्रामध्ये चालतो, हा प्रकार थांबला पाहिजे.
शेतकरी