भगवान नृसिंहाचे पावनधाम पर्यटन विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:34 PM2018-11-17T21:34:42+5:302018-11-17T21:35:05+5:30
मोहाडी / तुमसर तालुक्याच्या सीमेवर गोंदिया राज्य मार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या भगवान नृसिहांचे पावनधाम पर्यटनीय विकसापासून वंचित आहे. विकासाचा निधी खेचून आणण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून निव्वळ विकासाच्या दंतकथा रंगवून सांगितल्या जात असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी / तुमसर तालुक्याच्या सीमेवर गोंदिया राज्य मार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या भगवान नृसिहांचे पावनधाम पर्यटनीय विकसापासून वंचित आहे. विकासाचा निधी खेचून आणण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून निव्वळ विकासाच्या दंतकथा रंगवून सांगितल्या जात असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
माडगी / देव्हाडा येथील भगवान नृसिहांचे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखली जाते. वैनगंगा नदी टेकडी तीन भागात विभाजीत झाली आहे. मध्यभागी अखंड व उंच टोकावर मंदिर आहे. औदूंबर पारावर कडूलिंब, चिंच, पिंपळ आदी वृक्षांनी टेकडी वेढली आहे. प्राचीन काळी हे स्थळ योगी साधू सन्याशांचे साधनेचे स्थान होते. वाघासारख्या हिंस्त्र पशूंचेही येथे संचार होता. पांढऱ्या शुभ्र मंदिरातील लाल, भगवी, पताका सोनेरी सूर्यकिरणे पडताना शोभून दिसते. मंदिराची पायरी चढताच सपाट दगडाचा चबुतरा दृष्टीस पडतो. जिथे विश्रांती घेण्याची व्यवस्था आहे तिथे दगडांच्या प्रचंड शिळ्या उभ्या आहेत. निळसर पाणी सूर्याचे किरण पडताना चमकदार दिसते. वाळूतील शंख, शिंपले, चांदण्या भल्याभल्यांना मोहून टाकतात. मंदिर प्रवेशासाठी एक मुख्य द्वार आहे. एका रुंद चबुतºयाच्या दोन्ही बाजूला ‘गालचिरी’ नामक देवीची मूर्ती विराजमान आहे. त्या देवीला शेंदराची किंवा कुंकवाची पुडी वाहून भाविक दर्शन घेऊन पुढे जातात.
राजयोगी अण्णाजी महाराज, सद्गुरु योगीराज स्वामी, स्वामी सीतारामदास महाराजांच्या आदेशावरून राजयोगी अण्णाजी महाराज नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळीक होती. त्यांनी माडगी येथील नृसिंह टेकडीवरील तपश्चर्या, उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला.
महाराष्ट्र शासनातर्फे माडगी येथील नृसिंह टेकडीला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून नृसिंह टेकडी परिसरात विकासासाठी भरीव पर्यटन विकास निधी खेचून आणण्याचे आश्वासन अनेकदा लोकप्रतिनिधींनी दिले आहेत. परंतु आश्वासनांच्या पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी भाविकांना दिलेल्या शब्दाची आठवण करीत यावर्षी कार्तिक पौर्णिमेला भरणाºया यात्रेत दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी कटीबद्ध राहावे, अशी अपेक्षा आहे.
कार्तिक पौर्णिमेनंतर १५ दिवसांची यात्रा
कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसांची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. वैनगंगेच्या निर्मल, पवित्र पाण्यात स्नान करून पूजाअर्चना केली जाते. वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडावर पांढरेशुभ्र नृसिहांचे मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक रौद्र रुप तर, दुसरी साधी भोळी प्रतिकृतीची आहे. येथील मंदिराविषयी एक आख्यायीका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे.